मुंबई : शिवसेना (Shivsena) आणि संभाजी ब्रिगेड Sambhaji Brigade) यांची युती झाली आहे. सध्या प्रादेशिक पक्ष धोक्यात आले आहेत. प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी संभाजी ब्रिगेडसोबत युती करत असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी ५० आमदारांसोबत शिवसेनेविरोधात बंड पुकारल्यानंतर उद्धव ठाकरेंनी संभाजी ब्रिगेडसोबत युती केली आहे. एक नवं राजकीय समीकरण त्यामुळे निर्माण झालं आहे. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र लढणार असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे.
ठाकरे म्हणाले की, या लढवय्या सहकाऱ्यांचं मी स्वागत करतो. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशात प्रादेशिक पक्ष संपवण्याचं कारस्थान सुरु आहे. कोर्टातील निर्णय हा देशात लोकशाही राहील की बेबंदशाही राहील, याचा निर्णय असणार आहे. आपल्या विचारांचे लोकं आज सोबत येत आहेत. प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी एकत्र यायला हवं असं मला अनेकजण सांगत आहेत. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येऊन आपण मोठा इतिहास घडवू, असंही ते म्हणाले.
या शिवसेनेच्या आणि संभाजी ब्रिगेडच्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे , संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे उपस्थित होते.