उजनी धरण(फोटो-सोशल मीडिया)
पुणे : पुणे, सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्याला वरदायिनी ठरलेले उजनी धरण (यशवंत सागर) सध्या ९१.७२ टक्के भरले असून, धरणाच्या १६ मोर्यांतून १० हजार क्युसेकने भीमा नदीत विसर्ग सोडण्यात येत आहे. सद्यस्थितीत दौंड येथून उजणी धरणामध्ये १८ हजार ९९७ क्युसेक पाण्याची आवक सुरू असून, यामध्ये उजनीतून वीज निर्मितीसाठी १ हजार ६०० क्युसेक, तर सीना-माढा बोगदा, दहिगाव उपसा सिंचन योजना, मोठा बोगदा आणि मुख्य कालवा यांद्वारे विविध दराने पाण्याचा बहिर्वाह सुरू आहे. मागील ४५ वर्षांत प्रथमच यावर्षी मे महिन्यात उजनी धरणाची पातळी ’वजा (उणे) स्थितीमधून ’प्लस’मध्ये आली होती. सध्या पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील चार ते पाच दिवसांत धरण १०० टक्के भरून वाहणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
हेही वाचा : Top Marathi News Today : विदर्भात पावसाचा हाहा:कार; अनेक जिल्ह्यांत पावसामुळे जनजीवन विस्कळीत
धरणाची पाणीपातळी व विसर्ग स्थिती (दि. ९ जुलै सायंकाळी ६ वाजेपर्यंत) : एकूण पाणीपातळी – ३१९४.३४ मीटर (१२२.७९ टीएमसी), उपयुक्त साठा – ४९.१४ टीएमसी, पाण्याचा प्रसार क्षेत्र – ३२५.१७ चौरस किमी, साठा टक्केवारी – ९१.७२ टक्के
भीमा नदीत विसर्ग : १० हजार क्युसेक, दौंड येथून आवक : १८ हजार ९९७ क्युसेक, वीजनिर्मितीसाठी विसर्ग : १ हजार ६०० क्युसेक, सीना-माढा बोगदा : १८० क्युसेक, दहिगाव उपसा योजना : ८० क्युसेक, मोठा बोगदा : ९०० क्युसेक, मुख्य कालवा : १ हजार ९०० क्युसेक.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. कोकण विभाग, मराठवाडा, विदर्भ विभागात अत्यंत मुसळधार पावसाने कहर केला आहे. कोकण विभागात मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. तर हवामान विभागाकडून महाराष्ट्राला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भात तर पावसाने कहर केला आहे. नागपूर, भंडारा या जिल्ह्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
हेही वाचा : Maharashtra Rain Alert: पावसाच्या टार्गेटवर विदर्भ अन्…; पुढील काही दिवस ‘या’ जिल्ह्यांत तुफान बरसणार
हवामान विभागाने भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांना अति ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे शहरात देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. विदर्भात पावसाने कहर केला आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे.