बीड हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे (फोटो - सोशल मीडिया)
बीड – मागील दोन महिन्यापासून बीड हत्या प्रकरणामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे डिसेंबर महिन्यामध्ये अपहरण करुन निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणामध्ये इतर आरोपींना अटक करण्यात आली असून अद्याप एक आरोपी फरार आहे. कृष्णा आंधळे याला अटक करण्यात यावी या मागणीसह अनेक मागण्यांसाठी मस्साजोग गावाच्या लोकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. मस्साजोग गावाचे लोक तसेच देशमुख कुटुंबियांनी अन्नत्याग आंदोलन केले आहे. न्यायाच्या मागणीसह करण्यात आलेल्या या आंदोलनाला एकप्रकारे यश आले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक मागणी राज्य सरकारकडून पूर्ण करण्यात आली आहे.
मस्साजोग गावामध्ये संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे देखील आंदोलन करत आहेत. कालपासून हे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला आता यश आले आहे. विविध मागण्यांमधील उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याची मागणी करण्यात येत होती. धनंजय देशमुख यांची ही मागणी मान्य करण्यात आली आहे. उज्ज्वल निकम हे यापुढे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला लढणार आहेत. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची देशमुख कुटुंबियांची मागणी होती. त्यानंतर आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
देशमुख कुटुंबियांची आरोग्य तपासणी सध्या सुरु असून त्यांना अन्नत्याग आंदोलन मागे घेण्याची मागणी पोलिसांमार्फत केली जात आहे. आंदोलनस्थळी पोलिसांनी दाखल होत देशमुख कुटुंबियांना समजवण्याचा प्रयत्न केला आहे. देशमुख कुटुंबियांच्या एकूण सात मागण्या करण्यात आल्या होत्याा. यामधील एक मागणी आता मान्य झाली आहे. याबाबत धनंजय देशमुख म्हणाले की,एसआयटी, सीआयडीच्या अधिकाऱ्यांना वकिलांची मदत होईल. कुठे काही उणिवा वाटत असेल तर मदत होईल. जी चौकशी सुरू आहे, त्यात जास्तीचा फायदा होऊ शकतो. लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे, यासाठीही सरकारी वकिलांचा उपोयग होणार आहे, असा विश्वास मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिने देखील प्रतिक्रिया देत सरकारचे आभार मानले आहेत. वैभवी म्हणाली की, आज आमची एक मागणी मान्य केली असून इतर मागण्याही मान्य कराव्यात अशी अपेक्षा आहे. आम्हाला न्याय मागण्यासाठी जे करणं शक्य आहे, ते मी करणार आहे. कारण माझे वडील माझ्यासाठी सर्वस्व होते. त्यांच्यासाठी आम्ही न्याय मिळवू शकलो नाही तर आम्ही स्वतःला माफ करू शकणार नाही. एकीकडे मला माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्यायचा आहे तर दुसरीकडे मला परीक्षाही द्यायची आहे. दोन्ही गोष्टी माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत. पण त्याहीपेक्षा माझ्या वडिलांना न्याय मिळवून देणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं, असं मत वैभवी देशमुख हिने व्यक्त केलं आहे.