रत्नागिरी : प्रचारापेक्षा गैरसमज दूर करण्यासाठी ही महायुतीची सभा आयोजित केली आहे. ३९ वर्षे सलग शिवसेनेत राहिलो. काही माझे पटले नाही, म्हणून साहेबांना पत्र लिहिले आणि मी शिवसेना सोडली. आज मी राजकारणात आहे, त्याला सगळ्यांना कारण म्हणजे बाळासाहेब ठाकरे आहेत. मला मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरे यांनी बनवले. कोणाचेही वाद बसून मिटवले जातील, गैरसमज दूर करून कामाला लागा, असे आवाहन केंद्रीय मंत्री तथा महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी केले. देश महासत्ता बनविण्यासाठी आणि मोदींचे हात बळकट करण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे.
रत्नागिरी येथील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीची सभा शिर्के सभागृहात पार पडली. या सभेला दीपक केसरकर, ना.उदय सामंत, भाजप आमदार नितेश राणे, मनसेचे अविनाश जाधव, वैभव खेडेकर, राहुल पंडित आदींसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
नारायण राणे म्हणाले, मला नेता बनवलं जाईल अशी परिस्थिती नसताना बाळासाहेबांनी मला मुख्यमंत्री बनवले. काही लोक आता शिवसेनेत येऊन मला बोलतात की, मी शिवसेनेचा सुरुवातीच्या काळातील मेंबर आहे. मी जनतेचा सेवक म्हणून काम करीत आहे. बाळासाहेबांचे संस्कार, नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली मी काम करीत आहे. मला कुठल्याही पदावर पाठवले, मी कुठेही कमी पडलो नाही. वाद घातल्यावर काय मिळत नाही, शांत राहिलो म्हणून यशस्वी झालो. एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील तुम्ही सर्वजण आहात. गैरसमज जे काही असतील तरी वाद नाहीत. माझ्या प्रॉपर्टी, कामावरुन कुठलेही वाद आपल्याशी नाहीत. वाद घालायची गरज नाही. कोणाचेही वाद बसून मिटवले जातील. मी घाबरत नाही, पक्षाने आदेश दिला आहे, मी लढणार आहे. मी नारायण राणेंसाठी लढत नाही. मोदींसाठी मी लढत आहे. राणेंनी पदाचा उपयोग केवळ कोकणी माणसासाठी केला. उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपविण्याची जबाबदारी आपली आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची भाषा सुसंस्कृत माणसाची नाही. मोदींना तडीपार करण्याची भाषा ही ठाकरेंची आहे, हे चुकीचे आहे. अपघाताने उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले आहेत. गेल्या १० वर्षात विनायक राऊत यांनी काय केलं? संजय राऊत हा पागल आहे. उदय सामंत यांच्या मतदारसंघातून चांगले मताधिक्य मिळेल, असा मला विश्वास आहे.
ना.दीपक केसरकर म्हणाले, देशातील इतर राज्यात सर्वत्र भाजपाला जास्त खासदार मिळणार आहेत. महाराष्ट्रात ही लाट थोपविण्यचे काम केलं जाते. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आपली भक्कम युती आहे. राणे मुख्यमंत्री होण्यापूर्वी काय परिस्थिती होती आणि आता काय परिस्थिती आहे. कोकणातील विकासाची कामे होऊ शकली. स्वतः राणे उभे राहिले आहेत, त्यामुळे आपल्याला काम केलं पाहिजे. राणेंना कोकणातील माणसाने एकदा तरी मतदान केलं पाहिजे. बाळासाहेब ठाकरे यांना राणेंना सोडायचे नव्हते, पण ते काही कारणाने बाहेर पडले. ११ आमदारांचे राजीनामे देऊन बाहेर पडले आणि त्यांना पुन्हा राणेंनी निवडून आणले, असा नेता निवडणूक लढवत आहे. मोदींसाठी त्यांना मतदान केलं पाहिजे. किरण सामंत हे सिंधुरत्न योजनेत आत्मयतेने काम करतात. कोकणची कायापालट करण्याची ताकद आहे.
ना.रविंद्र चव्हाण म्हणाले, नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचे आहे. महायुतीचा कार्यकर्ता म्हणून चर्चा करीत होतो. जो कुणी उमेदवार असेल त्याचा प्रचार करुयात. निवडणुकीत उत्तर देण्यासाठी आपण काम केलं पाहिजे. तुम्ही कोणाशीही थेट बोलू शकता, माझ्याशी आणि किरण सामंत यांच्याशी बोला. कुणीही महायुतीचा कार्यकर्ता दुखावला जाणार नाही.
ना. उदय सामंत म्हणाले, आमचा प्रतिस्पर्धी उबाठा आहे, ज्या काही अडचणी आहेत त्या दोन-तीन दिवसात दूर केल्या जातील. एकसंघ पणे कामाला लागू, यात शंका नाही. दोडामार्ग ते चिपळूणपर्यंत एकमेव उमेदवार किरण सामंत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा नेत्यांनी दिलेल्या आदेशानुसार काम केलं जाणार आहे. मागच्या उमेदवारांपेक्षा जास्त मताधिक्य दिले जाईल. महायुतीच्या माध्यमातून विकास झाला आहे. नारायण राणे हे खासदार ४०० पेक्षा असतील. तिकिटासाठी आम्ही संघर्ष केला. वरिष्ठांचा निर्णय झाला, नारायण राणे हे उमेदवार आहेत. मात्र, किरण सामंत यांचा मानसन्मान होईल. स्वतः उमेदवार म्हणून काम करा.