राज्यात अवकाळीचे तैमान (फोटो- istockphoto)
Unseasonal Rain In Maharashtra: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात अनेक बदल पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी तापमानाने उच्चांक गाठला आहे. तर विदर्भ, मराठवाडा या प्रदेशातील काही जिल्ह्यांत अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. जळगाव, भुसावळ, बुलडाणा, नांदेड, अकोला जिल्ह्यात अवकाळीने कहर केला आहे.
विदर्भातील अकोला जिल्ह्यात देखील अवकाळी पाऊस झाला आहे. अकोला शहरातील एमआयडीसी परिसरात अवकाळी पावसासह गारपीट देखील झाली आहे. शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे फळबागांचे देखील नुकसान होण्याची शक्यता आहे.
नांदेडमध्ये देखील मोठे नुकसान
हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्याने फळबागाचे मोठे नुकसान झाले. या वादळी वाऱ्यामुळे नांदेड सह अर्धापूर मुदखेड या तालुक्यातील केळी बागेचे प्रचंड नुकसान झाले आहे. केळीच्या बघा अक्षरशः आडव्या झाल्या आहेत. अनेक केळी उत्पादक शेतकऱ्यांची केळी काढणीला आली होती. अचानक वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागेला मोठा फटका बसला. यावेळी नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव तिडके पाटील यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली.
बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पाऊस
बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा, लोणार, मेहकर, चिखली या तालुक्यातील 5 आणि 6 मे रोजी झालेल्या मुसळधार पाऊस आणि तुरळक गारपीट यामुळे शेतातील मका, हरभरा, आंबा, केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी वीज पडून जनावरे देखील ठार झाली आहेत. दोन दिवसांपासून परिसरात अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वारा पाऊस आणि गारा पडल्या आहेत. अचानक पाऊस आणि गारा पडल्याने अनेकांची धावपळ झाली. तर शेतातील शेतातील कांदा, ज्वारी, भाजीपाला, फळपीक, उन्हाळी पिकांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी नुकसानीचे अहवाल कृषी विभाग घेत असून, नुकसानग्रस्तांना शासनाकडून मदत देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशी प्रतिक्रिया जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी दिली आहे.
भडगाव तालुक्यातील आमडदे येथे गारपीट
जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील आमडदे येथे वादळी वाऱ्यासह गारपीट पाऊसाने हजेरी लावली आहे. सध्या मजुरां अभावी काढणीला आलेला मका, ज्वारी, बाजरी आदी पिके शेतात पडुन आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.