सौजन्य - नवराष्ट्र टीम
अकलूज : माळशिरस विधानसभा मतदारसंघात एकहाती लढत दिलेल्या राम सातपुते यांनी १६ व्या पेरीपर्यंत आपल्या मतांची आघाडी कायम ठेवण्यात यश मिळवले. सुरूवातीपासूनच राम सातपुते यांनी मातधिक्य घेण्यास सुरूवात केल्याने सातपुते यांनी तुतारीची धाकधूक वाढवली होती. परंतु जसजसे अकलूजपासून पुर्वेकडील गावे सुरू झाली, तसतशी उत्तम जानकर यांचे मताधिक्य वाढत गेले आणि सरते शेवटी जानकरांना वेळापूर परिसरातील गावांनी तारल्याने विजयाची माळ जानकरांच्या गळ्यात पडली.
पहिल्या फेरीला जानकर यांनी १९ मतांची आघाडी घेतली होती. तेव्हा मोहिते-पाटील यांची ताकद मिळालेली आणि तालुक्याच्या पश्चिम भागात धनगर समाजात चांगलेच प्रसिध्द असणारे जानकर शेवटपर्यंत मताधिक्यावर राहतील असा अंदाज होता. परंतु दुसऱ्याच फेरीमध्ये सातपुते यांनी ११५ मतांचे मताधिक्य घेऊन अगदी १६ व्या फेरीपर्यंत आपले मताधिक्य अबाधित राखत तालुक्याच्या पश्चिम भागात केलेल्या आपल्या कामाची चुणुक दाखवून दिली. ११ व्या फेरीअखेर सातपुते यांना ८ हजार ५३० मताधिक्य होते. त्यानंतर माळशिर पुढील गावांची मोजणी सुरू झाली. त्यानंतर सातपुते यांचे मताधिक्य हळूहळू कमी होऊ लागले.
१७ व्या फेरीमध्ये सातपुते यांचे मताधिक्य संपून जानकरांना ९० मतांची आघाडी मिळाली. तेथून पुढे २५ व्या फेरीपर्यंत जानकरांनी आपले मताधिक्य अबाधित ठेवत सुमारे १३ हजार १४८ मतांनी सातपुते यांच्यावर विजय संपादन केला. माळशिरस विधानसभा निवडणुकीसाठी एकूण २ लाख ४० हजार ८५१ इतके मतदान झाले. यामध्ये राम सातपुते यांना १ लाख ८ हजार ५७ मते मिळाली तर उत्तमराव जानकर यांना १ लाख २० हजार ३२२ मते मिळाली. जानकरांच्या विजयामध्ये धानोरे, उघडेवाडी, शेंडेचिंच, मळोली, काळमवाडी, पळवणी, बचेरी, साळमुखवाडी या गावांनी चांगले मताधिक्य दिले.
हे सुद्धा वाचा : सांगली जिल्ह्यात महायुतीला कल; कोणात्या पक्षाच्या किती जागा आल्या? पाहा एका क्लिकवर
योजनांचा प्रचारात भडीमार
राम सातपुते यांची उमेदवारी फायनल होत नव्हती. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी उमेदवारी अर्ज भरला. सुरूवातीपासूनच जानकर यांची उमेदवारी निश्चित असल्याने वातावरण अगदी जानकर यांच्या बाजुने होते. राम सातपुते निवडणुक न लढताच बिडला माघारी जातील की काय अशी अवस्था होती. परंतु सातपुते यांनी स्वबळावर प्रचार यंत्रणा हाताळली. निवडून येण्याची कोणतीही आशा नसताना सातपुते यांनी आपल्या प्रचारात हिंदुत्वाच्या मुद्यावर जोर देत भाजप सरकारने राबवलेल्या योजनांचा प्रचारात भडीमार केला, त्यामुळे सातपुते यांनी अनपेक्षितपणे जानकर यांना काट्याची टक्कर दिली.