पवना-मुळशी धरणांमधून पाण्याचा विसर्ग; पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सतर्कतेचा इशारा(File Photo : Khadakwasla Dam)
पिंपरी : पवना आणि मुळशी धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने (पीसीएमसी) नदीकाठच्या नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. शहर आणि धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सतत पडणाऱ्या पावसामुळे दोन्ही धरणांमध्ये जलसाठा झपाट्याने वाढला आहे.
महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार, पवना धरण सद्यस्थितीमध्ये ७७.५४ टक्के भरलेले आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस चालू असून, धरणामध्ये येवा प्राप्त होत आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित करणेकरिता सांडव्याद्वारे नदीपात्रामध्ये नियंत्रित पद्धतीने २८०० क्युसेक मुक्त विसर्ग चालू आहे.
भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवसांत घाटमाथा व पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त शेखर सिंग यांनी आपत्कालीन प्रतिसाद पथकांना पूर्ण सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी नदीकाठच्या भागांमध्ये जाणे टाळावे, तसेच सावधगिरी बाळगावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
आपत्ती परिस्थितीत तातडीने कारवाई करता यावी म्हणून पीसीएमसीची आपत्ती प्रतिसाद यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. आवश्यक साधनसामुग्रीसह बचावपथके तैनात करण्यात आली आहेत. आपत्ती नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत असून, वरिष्ठ अधिकारी, उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, असे शेखर सिंग यांनी सांगितले. महापालिकेच्या वतीने नागरिकांना कोणतीही अफवा न पसरवता, अधिकृत सूचना आणि इशाऱ्यांनुसारच वर्तन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
खेड तालुक्यात धरण क्षेत्रात संततधार
खेड तालुक्याच्या धरण क्षेत्रात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरण जलसाठा झपाट्याने वाढत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारी (ता. ७) संध्याकाळी 6 वाजेपर्यंत धरणातून एकूण २२०० क्युसेकने विसर्ग भीमा नदीमध्ये सोडण्यात आला.