अधिवेशन काळातच मुख्यमंत्र्यांनी केली 'ही' महत्त्वपूर्ण घोषणा; आश्वासन देत म्हटलं... (फोटो- महाराष्ट्र विधानसभा)
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असताना अनेक मुद्यांवर चर्चा झाली. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात चकमक झाल्याचे पाहिला मिळाले. याच अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केलं. ‘शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन आम्ही दिले होते ते पूर्ण करणारच’, असे त्यांनी म्हटले.
शेतकरी कर्जमाफी हा अनेक वर्षांपासूनचा प्रश्न आहे. वेळोवेळी याची चर्चा देखील केली जाते. मात्र, यंदाच्या अधिवेशनातही चर्चा झाली. यामध्ये मुख्यमंत्री म्हणाले, शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन आम्ही दिले होते ते पूर्ण करणारच. पण कर्जमाफी हा तात्कालिक उपाय आहे. कोणतेच राज्य दर पाच वर्षांनी कर्जमाफी देऊ शकत नाही. पण आम्ही शेतकऱ्यांसाठी कधीही हात आखडता घेतलेला नाही. शेतकऱ्यांचे जीवन सुखाचे व्हावे त्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना कराव्या लागतील. शिफारशी त्याच्याच करण्यासाठी राज्य सरकारने नवीन समिती स्थापन केली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
जनसुरक्षा विधेयकावर विरोधकांनी अवस्था सहनही होत नाही, सांगताही येत नाही अशी झाली आहे. संयुक्त चिकित्सा समितीत त्यांचाही समावेश होता. तेव्हा अंतिम मसुदा त्यांच्याच सहमतीने मंजूर केला गेला. मसुद्यात काहीच आक्षेपार्ह नसल्याने त्यांनी तेव्हा कोणताच विरोध केला नाही. आता मात्र कोणाचा तरी दबाव आल्याने त्यांनी आता वेगळी भूमिका घेतल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. आमचे महायुतीत सगळे आलबेल आहे. आम्ही तिघेही सक्षम असून कोणी कितीही काडया टाकण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही स्थिर आहोत, असेही ते म्हणाले.
गंमतीच्या गोष्टी सिरियसली का घेता?
उद्धव ठाकरेंना तुम्ही तुमच्यासोबत येण्याची ऑफर दिली आहे त्याबाबत विचारले असता, अहो उद्धवजी देखील याबाबत बोलले आहेत की अशा गोष्टी गांभीर्याने घ्यायच्या नसतात. आम्ही खेळीमेळीच्या वातावरणात बोललो तरी हेडलाईन होते. मी बोललो तर ती ऑफर झाली का? अलीकडच्या काळात संवाद होत असेल किंवा गंमतजंमत होते ती का सिरियसली घेता असा उलट सवाल फडणवीस यांनी केला.
विरोधी पक्षात एकी दिसलीच नाही
विरोधी पक्षात एकी दिसलीच नाही. अंतिम आठवडा प्रस्तावात खोटे प्रश्न होते. चुकीच्या माहितीच्या आधारावर कामकाज करण्याचा प्रयत्न केला. पायऱ्यांवर आंदोलन केले. मारामारीचा प्रकार अक्षम्य होता. तो अध्यक्षांनी गांभीर्याने घेतला आहे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.