मुंबई : मशिदीवरील भोंगे उतरविण्याच्या मनसेच्या भूमिकेला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी तीव्र विरोध केला आहे. राज ठाकरेंनी उद्या जर मशिदीवरील भोंगे उतरविण्याचे आदेश दिले, मनसैनिकांनी तसे प्रयत्न केले तर रिपब्लिकन कार्यकर्ते मशिदींना संरक्षण देतील, मुस्लिम समाजावरती अन्याय होऊ देणार नाही, अशी भूमिका रामदास आठवले यांनी मांडली आहे.
आठवले नेमकं काय म्हणाले?
राज ठाकरे यांनी भोंग्यासंदर्भात ४ तारखेपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. जर मशिदीवर भोंगे काढले गेले नाहीत तर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्याचे आदेश राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. उद्याच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसैनिकांना इशारा देताना आठवले म्हणाले, “वेडंवाकडं पाऊल उचलू नका, जर मशिदीवरील भोंगे उतरविण्याचे मनसैनिकांनी प्रयत्न केले तर रिपब्लिकन कार्यकर्ते मशिदींना संरक्षण देतील”
तसेच पुढे बोलताना आठवले म्हणाले राज ठाकरे यांनी भूमिका मांडण्याचा निश्चित अधिकार आहे, पण असंविधानिक भूमिका मांडण्याचा त्यांना कुठलाही अधिकार नाही. या देशामध्ये, राज्यामध्ये कायद्याचं राज्य आहे. तुम्हाला जसा हिंदू धर्माचा अभिमान आहे तसा इतरांनाही त्यांच्या त्यांच्या धर्माचा अभिमान असतो. मशिदीवरील लाऊड स्पीकरच्या कमी जास्त आवाजासंदर्भात चर्चा नक्कीच होऊ शकते. पण मुस्लिमांना टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं आठवले म्हणाले.
“बाकी समाजाला नेहमी मुस्लिमांना त्रास होतो. हिंदूचेही गणपती उत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी, विविध जयंत्या साजऱ्या होतात. आमचीही भीमजयंती साजरी होते. पूर्वी तर एकएक महिना भीमजयंतीच्या निमित्ताने कव्वाल्या वगैरे व्हायच्या. आताही रात्र-रात्रभर प्रबोधनाचे कार्यक्रम होतात. पण आतापर्यंत कधीच मुस्लिमांनी यांसंबंधी तक्रार केली नाही. आमचं एकचं म्हणणं आहे की हिंदू मुस्लिमांमध्ये वाद होता कामा नये”, असंही आठवले म्हणाले.