बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : संत सोपानकाका महाराज पालखी (Sant Sopankaka Maharaj Palkhi) सोहळ्याचे बारामती शहरात आगमन झाल्यावर पालखी सोहळ्याचे जंगी स्वागत करण्यात आले. माळेगाव येथील मुक्काम आटोपून संत सोपानकाका महाराज पालखी सोहळा बारामतीकडे रवाना झाला.
पालखीचे बारामती शहरात आगमन झाल्यानंतर मुख्याधिकारी महेश रोकडे, बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, नगरसेवक नवनाथ बल्लाळ यांनी पालखीचे स्वागत केले. तर यंदा संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचा शहरात दोन दिवस भिगवण चौक शारदा प्रांगण येथे मुक्कामी आहे. पालखी सोहळ्याने शहरात प्रवेश केल्यावर कसबा येथे भव्य स्वागत करण्यात आले. तर पालखी मार्गावर स्वागत कमानी उभारून व फुलांची सजावट करुन व रस्त्यावर दुतर्फा रांगोळीचा सडा घालण्यात आला होता.
यंदाच्या वर्षी पालखी सोहळा दोन वर्षाने होत असल्याने वारकरी व भाविक भक्तिभावाने सामील झाले होते. टाळ, मृदुंगाचा गजर व विठु नामाने अवघा परिसर दुमदुमून निघाला होता. खांद्यावर भगव्या पताका व डोक्यावर तुळशी वृंदावन, विठ्ठल रखुमाईची मूर्ती डोक्यावर घेऊन एका रांगेत निघालेले वारकरी हे चित्र अगदी मनमोहक दिसत होते.
रस्त्याच्या दुतर्फा भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. तर कसबा येथे बारामती नगर परिषद, बारामती तालुका दूध संघ, आर. जे. ग्रुप, श्री संत सावतामाळी तरुण मंडळ, अखिल कसबा युवक ग्रुपच्या वतीने पालखीत सहभागी वारकऱ्यांना अल्पोपहार, चहा, पिण्याचे पाणी व थंड पेयाचे वाटप करण्यात आले.