यशवंत बँक आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीकडून 27 जणांना नोटिसा
कराड : यशवंत सहकारी बँकेत कथित आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) तपासाला वेग दिला असून, या प्रकरणाशी संबंधित 27 जणांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नोटिसा मिळालेल्यांमध्ये बँकेचे माजी व विद्यमान संचालक, अधिकारी, कर्मचारी तसेच संबंधित नातेवाईकांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणात राज्य सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष, भाजप नेते शेखर चरेगावकर यांच्यासह बँकेचे चेअरमन, संचालक, अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या नातेवाईकांसह एकूण 50 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सनदी लेखापाल सी. ए. मंदार देशपांडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बँकेच्या २०१४ ते २०२५ या कालावधीतील व्यवहारांचे वैधानिक लेखापरीक्षण करताना कथित गैरव्यवहार उघडकीस आल्याचा उल्लेख आहे.
हेदेखील वाचा : नवी मुंबई महानगरपालिकेच्या ‘या’ प्रभागात होणार नाहीत निवडणुका; उच्च न्यायालयाने दिली अंतरिम स्थगिती
तक्रारीनुसार, बँकेत बोगस कर्ज प्रकरणे, बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्जवाटप, तसेच योग्य तारण न घेता मोठ्या प्रमाणावर कर्ज मंजूर करण्यात आल्याचे आरोप करण्यात आले आहेत. याशिवाय, काही प्रकरणांमध्ये जुनी थकबाकी खाती बंद असल्याचे दर्शवून नव्याने खाती उघडण्यात आली आणि त्या माध्यमातून निधी इतर व्यक्तींकडे वळवण्यात आल्याचा आरोपही तक्रारीत नमूद आहे.
‘ईडी’ने टाकले पाच ठिकाणी छापे
या प्रकरणाची दखल घेत ईडीने २३ डिसेंबर रोजी फलटण व कराडसह जिल्ह्यातील पाच ठिकाणी छापे टाकले होते. या कारवाईदरम्यान शेखर चरेगावकर यांचे बंधू शार्दुल उर्फ मुकुंद चरेगावकर, तसेच अन्य संशयितांच्या उपस्थितीत चौकशी करून महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली होती. छाप्यानंतर ईडीकडून शार्दुल उर्फ मुकुंद चरेगावकर, तसेच शेखर चरेगावकर यांची चौकशी करण्यात आली. तपासाच्या पुढील टप्प्यात आता संबंधित २७ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, त्यांना कागदपत्रे व माहिती सादर करण्यास सांगण्यात आल्याचे समजते.
तपासाअंती समोर येतील अनेक बाबी
ईडीकडून तपास प्रक्रिया सुरू असून, सर्व बाबी तपासाअंती स्पष्ट होतील, असे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या प्रकरणात पुढील टप्प्यात आणखी चौकशी व कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.






