छ्त्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर अनेक अपघात झाले आहेत. यापैकी बहुतांशी अपघात हे वाहन चालकाला झोप लागल्यामुळे (Samruddhi Mahamarg) झाले आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) तसा दावा केला आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन वाहन चालकांची झोप उडवण्यासाठी ‘एमएसआरडीसी’ने प्रत्येक 25 किलोमीटरवर रंबल स्ट्रीप लावण्यास सुरुवात केली आहे.
समृद्धी महामार्गावर अपघात रोखण्यासाठी करण्यात आलेले उपाय
समृद्धी महामार्गावरील गंगापूर, वैजापूर तालुक्याच्या हद्दीत रंबल स्ट्रीपच्या कामाला सुरुवात झाली आहे. रात्री पुलावरील कठडे दिसण्यासाठी रेडियम स्ट्रीप लावण्यात येत आहेत. प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर रंगीबेरंगी झेंडेदेखील लावण्यात येतायत. याशिवाय महामार्गावर वाहने कशी चालवावी; यावर टोल नाक्यावर चालकांना ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून सूचना देण्यात येणार आहेत. रंबल स्ट्रीप अपघात रोखण्यासाठी मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
रंबल स्ट्रीप्सचा अपघात रोखण्यासाठी कसा होतो उपयोग ?
रंबल स्ट्रीप म्हणजे महामार्गावर छोट्या पट्ट्यांच्या स्पीड ब्रेकरची एक श्रृंखला तयार करण्यात येते. या स्ट्रीपवरून वाहन गेल्यावर कंपनासारखा गडगडणारा आवाज ऐकू येतो. चालकाला सावध करण्यासाठी रंबल स्ट्रीपचा वापर होतो.
रंबल स्ट्रीप्स या साधारणपणे रस्त्यावर जिथे लेन वेगळ्या होतात त्याच्या आधी लावल्या जातात. याशिवाय रंबल स्ट्रीप्स किंवा स्टिकरचा वापर रस्त्याच्या मधोमधही केला जातो जेणेकरून गाड्यांना कर्ब किंवा डिव्हायडरच्या बाजुला उभं करता यावं. याच्यामागे हा विचार असतो की, जर गाडी एखाद्या लेनच्या बाहेर गेली किंवा कर्बच्या जवळ गेली तर वाहन चालवणाऱ्यांना पुन्हा लेनमध्ये जाण्याची सूचना मिळो. त्यामुळे वाहनाची गती कमी करणं आणि अपघातापासून वाचणं यासाठी मदत होते.
एका संशोधनानुसार, रंबल स्टिकर रस्ते अपघात रोखण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. कमी खर्चात अपघात वाचवण्यासाठी उपयुक्त ठरणारा हा मोठा उपाय आहे. मात्र ड्रायव्हर याच्याकडे अनेकदा दुर्लक्ष करतात.
तुम्ही कधी गाडी चालवत असाल तर रंबल स्ट्रीप्स कशासाठी आहेत हे विसरू नका. त्यामुळे अपघात टाळणं शक्य होईल.