( फोटो सौजन्य : IANS)
काबुलमधून चालवले जाणारे ‘रेडियो बेगम’ हे स्टेशन आज अफगाण महिला, मुली आणि लहान मुलांचा आवाज बनले आहे. दररोज सकाळी या रेडिओ स्टेशनची टीम कार्यालयात जाण्यासाठी निघते, तेव्हा त्यांना विशेष सुरक्षा घ्यावी लागते. सध्याच्या निर्बंधांमुळे तरुण महिलांना सार्वजनिक ठिकाणी एकट्याने प्रवास करणे अशक्य झाले असून, त्यांना घराबाहेर पडताना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. युनेस्कोच्या पाठिंब्याने चालणाऱ्या या स्टेशनमध्ये सुमारे ३० महिलांची टीम कार्यरत आहे. विशेष म्हणजे, तालिबानने प्रसारमाध्यमांमध्ये महिलांच्या आवाजावर बंदी घातलेली असतानाही, हे स्टेशन अफगाणिस्तानच्या बहुतांश प्रांतांत महिलांचे विचार पोहोचवत आहे.
या रेडिओ स्टेशनच्या संस्थापिका हमीदा अनन यांनी या संघर्षाची दाहकता मांडली आहे. हमीदा स्वतः पत्रकारितेचे शिक्षण घेऊन परदेशातून मायदेशी परतल्या होत्या. त्यांनी सांगितले की, आज अफगाणिस्तानात टीव्ही किंवा रेडिओ लावला तर फक्त पुरुषांचेच आवाज ऐकू येतात. अशा पुरुषप्रधान वातावरणात ‘रेडियो बेगम’वर महिलेचा आवाज ऐकू येणे म्हणजे अंधाऱ्या समुद्रात दिसणाऱ्या एका छोट्या प्रकाशाच्या किरणासारखे आहे. ऑगस्ट २०२१ मध्ये तालिबानच्या सत्तांतरानंतर या स्टेशनला आपले स्वरूप पूर्णपणे बदलावे लागले. संगीत आणि मनोरंजनाचे कार्यक्रम बंद करून त्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित केले.
जेव्हा तालिबानने मुलींच्या शाळा बंद केल्या, तेव्हा ‘रेडियो बेगम’ने ‘शाळा बंद असली तरी शिक्षण नाही’ हे ब्रीदवाक्य घेऊन दररोज सहा तासांचे शैक्षणिक कार्यक्रम सुरू केले. दारी आणि पश्तो या स्थानिक भाषांमध्ये हे कार्यक्रम प्रसारित केले जातात. विशेष म्हणजे, महिलांना त्यांचे अधिकार समजावून सांगण्यासाठी हे स्टेशन कुराणमधील आयतांचा आणि इस्लामचा आधार घेते, जेणेकरून सत्ताधारी त्यांच्यावर आक्षेप घेऊ शकणार नाहीत. वारसाहक्क, घटस्फोट आणि विधवांचे अधिकार यावर धार्मिक संदर्भांसह चर्चा केली जाते.
आजच्या घडीला अफगाण महिलांसाठी सार्वजनिक ठिकाणी वावरणे ही एक मोठी लढाई आहे. पण अशा काळातही ‘रेडियो बेगम’ने माघार न घेता महिलांच्या स्वप्नांना आणि विचारांना जिवंत ठेवण्याचे काम केले आहे. ज्या सरकारने आपल्या ५० टक्के लोकसंख्येला दुर्लक्षित केले आहे, त्यांच्या हक्कासाठी हे रेडिओ स्टेशन आज एक भक्कम व्यासपीठ ठरले आहे.






