फोटो - फेसबूक
जळगाव : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यामुळे महायुतीसह महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. सर्व नेत्यांचे दौरे वाढले असून इच्छुकांनी तयारी सुरु केले आहे. दरम्यान, राज्यातील असे एक नेते आहेत, जे नक्की महायुतीमध्ये आहेत की महाविकास आघाडीमध्ये आहेत, याबाबत राष्ट्रवादी शरद पवार गट व भाजप पक्षातील नेते देखील एकनाथ खडसे यांच्याबाबत अनभिज्ञ आहेत. त्यामुळे नाथाभाऊ नक्की कुठे आहेत, असा प्रश्न राजकीय वर्तुळामध्ये विचारला जात आहे.
मोदींच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होणार का?
एकनाथ खडसे हे आधी भाजपमध्ये होते. मात्र नंतर त्यांनी शरद पवार यांची साथ देण्याचे ठरवले. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. आता एकनाथ खडसे यांची घरवापसी होणार असल्याची चर्चा आहे. मात्र त्याचा मुहूर्त काही ठरवल्या जात नाही. लोकसभा निवडणूकीच्या पूर्वी एकनाथ खडसे भाजपमध्ये पुन्हा येतील असे बोलले जात होते. मात्र लोकसभा निवडणूक होऊन निकाल आला. एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे केंद्रीय राज्यमंत्री झाल्या. त्यानंतर आता विधानसभा निवडणूका जवळ येऊ लागल्या आहेत. तरी देखील एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेश झालेला नाही. त्यामुळे ते नक्की कोणत्या पक्षाचे याची चर्चा सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 25 ऑगस्टला जळगाव दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे थेट मोदींच्या उपस्थितीमध्ये एकनाथ खडसे यांचा पक्षप्रवेश होणार का? याची प्रतिक्षा लागली आहे.
सुप्रिया सुळे अनभिज्ञ
सध्या एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये आहेत. त्यांनी पक्षामध्ये राजीनामा दिला का असा सवाल माध्यम प्रतिनिधींनी विचारला. यावर उत्तर देताना सुळे म्हणाल्या, “मी माहिती काढून तुम्हाला सांगते. पण खडसेंनी राजीनामा दिला का? पक्षप्रवेश करणार का? हे मला विचारण्यापेक्षा खडसेंना विचारलं तर लवकर उत्तर मिळू शकेल. त्यांनी जर राजीनामा दिला असं म्हणत असतील तर आमच्या रेकॉर्डला ते असेल,” असे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी आहेत की नाही याबाबत सुप्रिया सुळे यांना देखील माहिती नाही.
त्यांचं स्टेटस नक्की काय त्यांना विचारा
एकनाथ खडसे यांच्याबाबत भाजप नेत्यांना देखील तितकीशी माहिती नाही. भाजप नेते गिरीश महाजन यांना एकनाथ खडसे यांच्याबद्दल विचारले असता त्यांनी राजकीय टोलेबाजी केली. महाजन म्हणाले, “एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे कोणालाच माहीत नाही. भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार का हे तुम्हीच त्यांना विचारा. खडसेंची डायरेक्ट वरती लाईन आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे का ? किंवा ते भाजपमध्ये येणार आहेत का? हे तुम्ही त्यांनाच जाऊन विचारा असं महाजन म्हणाले. सुप्रिया सुळे यांना माहित नाही, जयंत पाटलांना माहित नाही, शरद पवारांनाही माहित नाही. त्यापेक्षा त्यांनाच जाऊन विचारा त्यांचं स्टेटस नक्की काय…” असा राजकीय टोला गिरीश महाजन यांनी लगावला. त्यामुळे एकनाथ खडसे तळ्यात की मळ्यात असा प्रश्न राजकीय वर्तुळामध्ये निर्माण झाला आहे.