राजापूर: कोकणातील प्रस्तावित बारसू सोलगाव येथे रिफायनरी प्रकल्प (Barsu Refinery Project) विरोधात स्थानिक आक्रमक झाले असून, आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. स्थानिक आंदोलनावर ठाम आहेत. भूसंपादनाच्या (Land) सर्वेक्षणास पोलिस (Police) बंदोबस्तात आलेल्या अधिकारी – कर्मचाऱ्यांची हजारो ग्रामस्थांनी वाट अडवण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन रत्नागिरीत हलवल्यामुळे तणाव कमी झाला. या भागात 31 मेपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. दरम्यान, बारसू रिफायनरीवरुन सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. तसेच आरोप प्रत्यारोप केले जाताहेत. मविआच्या नेत्यांनी हे सरकार दडपशाहीचा वापर करत असल्याचा आरोप केला आहे. तर याचे राजकारण करु नका, असं सत्ताधाऱ्यांनी म्हटलं आहे. त्यामुळं हे आंदोलन पेटण्याची शक्यता असून, याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. तर अनेक राजकीय नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया येताहेत. दरम्यान, यावर उद्दव ठाकरेंनी मौन सोडले आहे.
…म्हणून अहवाल मागवला
दरम्यान, आज भारतीय कामगार सेनेच्या 55 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला उद्धव ठाकरे संबोधित करत होते. बारसू रिफायनरी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच पत्र दिलं होतं, आणि आता ते विरोधात आहेत त्यामुळं विरोध करताहेत, असा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. या पत्रावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खुलासा करत, सत्ताधाऱ्यांवर पलटवार केला आहे. हे पत्र मीच काढलं होतं अशी कबुली देतानाच दिल्लीतून वारंवार विचारणा झाल्यामुळेच मी रिफायनरीचा प्राथमिक अहवाल मागवला होता, असं खुलासा उद्धव ठाकरे यांनी केला.
पण तो प्रकल्प मी राबवला नाही
पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, उद्धव ठाकरेंचं एवढं ऐकता तर मग गद्दारी करून सरकार का पाडलं? आरेचा निर्णय का फिरवला? कांजूरचा निर्णय का फिरवला? रोज उठून किती लोक बुलेट ट्रेनने अहमदाबादला जातात?, अडीच वर्ष मविआचे सरकार होते. पण पोलिसांच्या बळावर मी तो प्रकल्प का राबवला नाही? असं उद्धव ठाकरे म्हणाले.
ती भूमिका माझी नाही, स्थानिकांची
समृद्धी महामार्गासारखाच रिफायनरीचा विषय का सोडवला जात नाही? कुणाच्या सुपाऱ्या घेत आहेतय़ प्रकल्प लादले जात आहेत. जमीन आमची इमले तुमचे असं नाही चालणार. बारसू आणि नाणारबाबतची जी भूमिका होती ती माझी नव्हती ती तिथल्या लोकांची होती. बारसूत रोजगार मिळणार आहे का? कंत्राट पद्धतीने नाही. कायमस्वरुपी मिळणार की नाही ते सांगा, अंस उद्धव ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केला.