शेतकऱ्यांना योग्यवेळी कर्जमाफी : अजित पवार
अकोला : राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जावी, अशी मागणी शेतकऱ्यांसह त्यांच्या नेत्यांकडून केली जात आहे. मात्र, शासन स्तरावर यावर निर्णय होणे अद्याप बाकी आहे. त्यावरूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं विधान केलं. ‘राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य शासनाकडून योग्यवेळी घेतला जाणार आहे. अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या बच्चू कडू यांच्याशी चर्चा करण्याची सरकारची तयारी आहे’, असे त्यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी (दि.१२) अकोला दौऱ्यावर आले होते. यावेळी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांचे सुरू आहे. या प्रकरणावर अजित पवार यांनी त्यांच्याशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली. सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय योग्य वेळी घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
तसेच शेतकऱ्यांची आर्थिक लूट करणाऱ्या कंपन्या व दुकानदारांवर कठोर कारवाई केली जाईल. सरकार खते व बी बियाण्यांचे लिकिंग करणाऱ्या दुकानदार व कंपन्यांना सोडणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणी दुकानदारांचे परवाने रद्द केले जातील, तर कंपन्यांवरही योग्य ती कारवाई केली जाईल, असा गर्भित इशारा अजित पवार यांनी दिला.
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी देखील दिली जाईल. त्यासाठी योग्य वेळ येण्याची गरज आहे. लाडक्या बहिणींनाही दरमहा मदत देण्यास सरकार तत्पर आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे किंवा इतर कुठलेही प्रश्न असो, ते चर्चेतून सुटत असतात. बच्चू कडू यांच्याशी चर्चा करण्यास राज्य सरकारची तयारी आहे. सरकार व प्रशासन यासंबंधी त्यांच्या संपर्कात असल्याचेही पवार यांनी सांगितले.
मुख्यमंत्री-राज ठाकरे भेटीवर म्हणाले…
मनसे अध्यक्ष राज ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवरही अजित पवार यांनी भाष्य केले. राज्यातील विविध पक्षांचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटत असतात. महाराष्ट्राची अशी संस्कृती राहिली आहे, असे ते म्हणाले.