श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर पंढरपूर (फोटो- सोशल मीडिया)
पंढरपूर: श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे अलंकार अत्युत्कृष्ट व असामान्य कलाकुसरीचे तसेच पुरातन व दुर्मिळ आहेत, असे अलंकार उत्सवाप्रसंगी श्रींस परिधान करण्यात येतात. नवरात्र उत्सवाच्या पूर्वतयारीसाठी श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे पुरातन अलंकार गाठविण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याचेही माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
शिवकालीन, पेशवेकालीन अनेक अमूल्य दागिणे श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेस असून, यामध्ये श्री विठ्ठलास सोन्याचे पैंजण, बाजीराव कंठी, मत्स्य, तोडे, सोवळे (धोतर), हिऱ्यांचा कंबरपट्टा, बाजुबंद, दंडपेटय़ा, मणिबंध, सोन्याची राखी, तुळशीची सोन्याच्या मण्यांत गुंफलेली माळ, कौस्तुभमणी, हिरे, पाचूंनी गुंफलेली मोत्यांची कंठी, बोरमाळ, मोत्यांच्या माळा, पुतळ्यांच्या माळा, मोहरांच्या माळा, नवरत्नांचा हार, सोन्याचे मुकुट, हिऱ्यांचा मुकुट, सोन्याची शिंदेशाही पगडी, चांदीची काठी, सोन्याची मकरकुंडले, नील व हिरे बसवलेला नाम- म्हणजे सोन्याचा गंध असे अनेक प्रकारचे अनमोल अलंकार आहेत.तसेच श्री रुक्मिणी मातेस सोन्याचे वाळे, पैंजण, साडी, कंबरपट्टे, माजपट्टा, रत्नजडित पेटय़ा, हिरे, माणिक, पाटल्या, मोत्यांच्या व रत्नजडित जडावांच्या बांगडय़ा, गोठ, तोडे, हातसर आहेत.
गळ्यातील अलंकारांमध्ये कारल्याचे मंगळसूत्र, दशावतारी मंगळसूत्र, कोल्हापुरी साज, पाचूची गरसोळी, लहान सरी, मोठी सरी, पुतळ्याची माळ, मोहरांची माळ, एकदाणी, बोरमाळ, ठुशी, तुळशीचा हार, झेला, पोहे हार, चंद्रहार,चपलाहार, पेटय़ांचा हार, शिंदेशाही हार, तन्मणी, चिंचपेटी, नवरत्नांचा हार, शिंदे हार, जवाच्या माळा आणि हायकोल सुर्य-चंद्र असे दागिने आहेत. हिऱ्यांचे खोड असलेला तन्मणी, तारामंडल असे अनेक प्रकारचे अनमोल अलंकार आहेत.
‘मकर कुंडले तळपती श्रवणी। कंठी कौस्तुभमणी विराजित।’
असे अलंकाराचे वर्णन अनेक अभंगांतून संतांनी केलेले आहे.
सदरचे अलंकार जतन व सुरक्षततेच्या दृष्टीने प्रतिवर्षी गाठविण्यात येतात. सदरचे काम नवरात्र उत्सवापूर्वी करण्यात येते. त्याप्रमाणे यावर्षी सदरचे अलंकार गाठविण्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन घेणं आता सोपं; ‘इथं’ भाविकांना करता येणार ऑनलाईन नोंदणी
श्री विठ्ठल रूक्मिणी मातेचे दर्शन घेणं आता सोपं
श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुसज्ज निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने पंढरपूर शहरात श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवासाची उभारणी करण्यात आली आहे. या भक्तनिवासातील खोल्या नोंदणी करण्यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली असून, मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर भाविकांना ऑनलाईन नोंदणी करता येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.