पुणे : कुस्तीचा सराव करत असताना एका पैलवानाला ह्रदयविकाराचा झटका आला आणि यामध्येच त्या पैलवानाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. स्वप्नील पाडाळे (Swapnil Padale) असे यामध्ये मृत पावलेल्या पैलवानाचे नाव आहे. स्वप्निल हा पुण्यातील मारुंजी येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलनात सराव करत होता. त्यादरम्यान ही घटना घडली.
स्वप्निल पाडाळे हा मारुंजी या ठिकाणी असलेल्या कुस्तीच्या तालमीत नेहमीप्रमाणे सरावासाठी आला होता. कुस्तीसाठी सराव करताना पैलवानांना सपाट्या मारायच्या असल्यामुळे स्वप्निलदेखील व्यायाम करत होता. व्यायाम करत असताना अचानक त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि अचानक व्यायाम करताना तो खाली कोसळला. अचानक खाली पडल्याचे पाहताच तालमीतील इतर सहकाऱ्यांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पैलवान स्वप्निलच्या अकाली निधनामुळं पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सकाळी आला ह्रदयविकाराचा झटका
स्वप्निल हा गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील मारुंजीच्या मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात कुस्तीचा सराव करत होता. आज सकाळी साडेसातच्या सुमारास तालमीत कुस्तीचा सराव करत असतानाच त्याला ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला.
स्वप्निल इतर मुलांनाही शिकवायचा
स्वप्निल पाडाळे याने मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलनातून कुस्तीचे प्रशिक्षण घेतले होते. तो सध्या अनेक ठिकाणी मुलांना कुस्ती शिकवत असे. पण आज त्याचा अचानक मृत्यू झाला.