"कधी आपल्या संस्थांवर तिरंगा फडकवला नाही, ते तिरंगा यात्रा काढत आहेत"; यशोमती ठाकूर यांचा भाजपवर हल्लाबोल (फोटो सौजन्य-X)
अमरावती : काँग्रेस नेतृत्वाने या देशासाठी रक्त वाहिले आहे, प्रसंगी प्राणांचे बलिदान देखील दिले आहे… पण ज्यांनी कधी आपल्या संस्थांवर तिरंगा फडकवला नाही, ते आज तिरंगा यात्रा काढत आहेत, अशी घणाघाती टीका माजी महिला व बालविकास मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी भाजपवर केली. ओपरेशन सिंदूरमध्ये भारतीय जवांनांनी दाखवलेल्या शौर्याबद्दल आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर बुधवार ( २१ मे) रोजी माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त तसेच राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिनानिमित्त काँग्रेसने अमरावतीत ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन केले होते.
पहलगाम हल्यानंतर ज्या प्रमाणे सरकारने सर्वपक्षीय बैठक घेतली तशी बैठक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावात युद्धबंदी करताना का घेतली नाही ? दहशतवादी पहलगाममध्ये आलेच तरी कसे ? हल्ल्यानंतर हे दहशतवादी कुठे पळून गेलेत ? त्यांना पकडण्याची जबाबदारी कोणाची होती. यांनी कधी स्वतच्या संस्थांवर तिरंगा फडवला नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर हे लोक आता तिरंगा यात्रा काढत सुटले आहेत. यासह अनेक प्रश्नांचा घणाघात माजी मंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांनी मोर्च्यादरम्यान सरकारवर केला.
यासरकारने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे, कर्झमाफी करून सातबारे कोरे करणार असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र काहीच केले नाही, सर्व खोटे आहे. शेतपिकांचे अतोनाच नुकसान झाले आहे, शेतीपिकांचे पंचनामे नाहीत, शेतकऱ्यांना सरकारकडून मदत नाही. याचे सरकारला काहीच देणे घेणे नाही. सरकार फक्त निवडणुकीत रमले आहे, अशी टीका देखील यावेळी यशोमती ठाकूर यांनी केली.
भारतीय सैन्याने दहशतवाद्यांविरोधात केलेल्या आपरेशन सिंदूरचे आम्ही स्वागत करतो. भारततीय सैन्यने दाखविलेल्या शोर्याचे आम्ही कौतुक करतो. मात्र युद्धबंदी करण्याचा निर्णय सातासमुद्रापार असलेल्या अमेरिकेचे राष्टाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कसे काय करू शकतात, पंतप्रधान नरेंद्र याचे कारण देशाला का सांगत नाहीत, लपवा छपवी का करित आहेत ? असा सवाल प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला. तिकडे जवान सिमेवर लढत आहेत तर इकडे शेतकरी आपल्या शेताच्या धुऱ्यावर राबत आहेत, मात्र शेतकऱ्यांची काळजी वाहणारे सरकारच येथे नाही, असा प्रत्यय येत आहे. खरीपाचे कुठलेही नियोजन नाही, कर्जमाफीचा पत्ता नाही, अशा शब्दांत हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारला धारेवर धरले.
हजारो शेतकरी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अडचणीत सापडले आहे. संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतमालाला आधारभूत हमीभाव., नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाची तातडीने भरपाई द्यावी, शेतकऱ्यांचा सवलतीच्या दराने नियमित वीज पुरवठा, शेतमाल खरेदीसाठी सरकारी खरेदी केंद्रे तातडीने सुरू करावीत आदी मागण्या सरकारकडे करण्यात आल्या आहेत.
आजच्या ट्रॅक्टर मोर्चात हजारो शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य नागरिक व कॅाग्रेसचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोर्च्यात अ्ग्रभागी असलेल्या यशोमती ठाकूर यांनी सुरुवातीपासून समारोपापर्यंत माईक हाती घेवून सातत्याने सरकारविरोधात घोषणाबाजी केली. जय जवान जय किसान या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. ट्रॅक्टर मोर्चात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्वत: ट्रॅक्टर चालवीला आहे.