सौजन्य : सोशल मीडिया
फुलंब्री : मराठा आरक्षण मिळत नसल्याने निराश झालेल्या १८ वर्षीय तरुणाने ‘एकच मिशन मराठा आरक्षण’ अशी चिठ्ठी लिहून शेतातील जनावराच्या गोठ्यात दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना फुलंब्री तालुक्यातील गणोरी येथे घडली. गजानन नारायण जाधव असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.
मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या पेटलेला असून, आतापर्यंत अनेक मराठा तरूण बांधवांनी सरकारकडून आरक्षणासंदर्भात घोषणा होत नसल्याने आत्महत्येचा मार्ग पत्करला आहे. आता फुलंब्री तालुक्यातील गणोरी येथील बारावीत शिकत असलेला गजानन नारायण जाधव याने शनिवारी सकाळीच्या सुमारास गट नंबर १९१ मधील शेतातील जनावराच्या गोठ्यात दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा लहान भाऊ कार्तिक हा शेतात आला, तेव्हा त्याला गजाननने आत्महत्या केल्याचे दिसून आले.
त्यानंतर त्याने आरडाओरडा केली असता शेजारी असलेले शेतकरी हे धावून आले. फुलंब्री पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गजाननचा मृतदेह ताब्यात घेतला. यावेळी मृतक गजाननच्या खिशातून रुमालामध्ये एक चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीत ‘एकच मिशन मराठा आरक्षण’ असे लिहिले होते.