अमरावती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान चालिसा पठन न केल्यास मातोश्री समोर हनुमान चालिसा वाजविणार असल्याचा इशारा आमदार रवी राणा यांनी दिला होता. मात्र, युवा सेनेने सडेतोड उत्तर देत शुक्रवारी (१५ एप्रिल) रात्रीच आमदार राणांच्या शंकर नगर स्थित गंगासावित्री निवास स्थानासमोर हनुमान चालिसा वाजविला. तर दुसरीकडे आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांनी शनिवारी (१६ एप्रिल) अकोली मार्गावरील पगडीवाले हनुमान मंदिरात हनुमान चालिसाचे पठन करीत १०० मंदिरात भोंगे वाटप केले. घरासमोर धिंगाणा घालणारे भगोडे होते, शिवाय छातीठोकपणे मातोश्रीवर जाणार असल्याचे आमदार राणा म्हणाले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मस्जिदीवरील भोंगे काढा अन्यथा भोंगे लावत हनुमान चालिसा वाचणार असल्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर हनुमान चालिसावरून राजकारण तापल्याचे दिसून येत आहे. आता आमदार रवी राणा हे मातोश्री समोर हनुमान चालिसाचे पठन कधी करणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
गंगा सावित्री समोरच वाजला चालिसा
आमदार रवी राणा यांनी शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालिसा पठन करण्याचा इशारा दिला होता. त्याला सडेतोड उत्तर देत युवा सेनेचे विभागीय सचिव सागर देशमुख यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी शुक्रवारी रात्रीच आमदार राणा यांचे शंकर नगर स्थित गंगासावित्री हे निवासस्थान गाठले. रात्री १० ते ११ वाजताच्या सुमारास राणांच्या घरासमोर लाऊड स्पीकर लावत हनुमान चालिसेचे पठन केले. तब्बल अर्धा तास संपूर्ण हनुमान चालिसा वाचण्यात आली. यावेळी घोषणाबाजी देखील करण्यात आली. युवा सेनेने अचानक केलेल्या या आंदोलनामुळे प्रशासनाची देखील तारांबळ उडाली. या आंदोलनात सागर देशमुख यांच्यासह श्याम धाने, शुभम जवंजाळ, पिट्टू चव्हाण, आतिष यादव, निलेश जामणारे, प्रतिक डुकरे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
अंधारात पुतळा बसविणाऱ्यांनी ज्ञान पाजू नये – सागर देशमुख, विभागीय सचिव युवा सेना
हनुमान चालिसेचे पठन करण्यास कोणतेच वेळ काळाचे बंधन नाही. संपूर्ण हनुमान चालिसेचे पठन केले. रात्रीच्या अंधारात चालिसेचे पठन केले, असे आमदार राणा कोणत्या अधिकाराने बोलतात. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थानापन्न करण्यास मुहूर्ताची वेळ-काळाची गरज आहे. राजापेठ उड्डाणपूलावर रात्रीच्या अंधारात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविणाऱ्यांनी ज्ञान पाजळू नये.
१०० भोंगे वाटले
हनुमान जयंतीच्या पर्वावर आज आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांनी अकोली स्थित पगडीवाले हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालीसा पठण केले. महाआरती करून आघाडी सरकारच्या रूपाने लागलेली साडेसाती दूर होऊन शेतकरी-शेतमजूर, व्यापारी, उद्योजक, गृहिणी, विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिक यांना सुख समृद्धी शांती लाभावी अशी प्रार्थना केली. या संगीतमय हनुमान चालीसा पठनाने परिसरातील वातावरण प्रसन्न झाले. आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांनी राममंदिरात सुंदरकांड व हनुमान मंदिरात हनुमान चालीसा वाचण्यासाठी हनुमान जयंतीच्या पर्वावर गंगासावित्री निवासस्थानी विविध राममंदिर व हनुमान मंदिर देवस्थानांना १०० भोंग्यांचे वाटप करण्यात आले. भोंगे वाटपाचा कार्यक्रम पुढील एक महिना सुरू राहणार आहे. मागेल त्याला भोंगा देण्याचा निर्धार आमदार राणा यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राला लागली साडेसाती – आमदार राणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावरून आल्यापासून महाराष्ट्राला साडेसाती लागल्याचे वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केले. महाराष्ट्राला राज्याला लागलेली साडेसाती मिटविण्यासाठी हनुमान जयंतीच्या पावन पर्वावर मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचावी. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आपल्या रक्तात अजूनही कायम आहे हे सिद्ध करून दाखविण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी हनुमान चालीसा पठण करावे. अन्यथा महाविकास आघाडी सरकारच्या दबावाखाली आता शिवसेना ही काँग्रेस सेना झाल्याचे समजू. रात्रीच्या अंधारात भगोड्या सेनेच्या कार्यकर्त्यांनी माझ्या घरासमोर येऊन धिंगाणा घातला. त्यांना माझ्या घरासमोर हनुमान चालीसा पठण करायचे होते. तर अशी नारेबाजी आणि धिंगाणा घालण्याचा प्रकार केला आहे. सर्व भगोडे सैनिक चोरासारखे घरासमोर आले आणि दारू पिऊन त्यांनी गोंधळ घातला.