actor kiran manes father dinkarrao mane passed away at the age of 86
प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता आणि ठाकरे गटाचे नेते किरण माने यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेता किरण माने यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्यांनी फेसबूकवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना आणि आपल्या कुटुंबीयांना ही माहिती दिली आहे. त्यांच्या वडिलांचे नाव दिनकरराव माने असं होतं. ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. आज (३० मार्च- रविवार) संध्याकाळीच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शेअर केलेल्या फेसबूक पोस्टमध्ये किरण माने यांनी लिहिलंय की, “माझे नातेवाईक, मित्रमंडळी आणि हितचिंतकांच्या माहितीसाठी… माझे वडील दिनकरराव मारुती माने यांचे आज सातारा येथे राहत्या घरी वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. आज संध्याकाळी ६ वाजता संगम माहुली, सातारा येथील कैलास स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.” नेमकं अभिनेत्याच्या वडिलांचे निधन कसे झाले ? याबद्दल माहिती मिळू शकलेली नाही.
मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेता किरण माने यांच्या वडिलांना डिमेन्शिया अर्थात स्मृतिभ्रंश झाला होता. एका मुलाखतीत अभिनेत्याने सांगितले होते की, “आपल्याला मुलासाठी बघितलेली सर्व स्वप्न आज पूर्ण होत आहेत, तरी तुम्ही समोर असूनही तुम्हाला ती अनुभवता येत नाहीत. कारण तुम्हाला काहीच आठवत नाहीये.” किरण माने यांनी शेअर केलेल्या पोस्टवर चाहत्यांकडून त्यांच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. अनेक चाहत्यांनी अभिनेत्याने शेअर केलेल्या पोस्टवर ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ अशी कमेंट केली आहे.