फोटो सौजन्य - सोशल मीडिया
जगभरातील फिल्म इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक मानाचा समजला जाणारा पुरस्कार म्हणजे ऑस्कर. यंदाच्या ९७व्या अकादमी पुरस्कारांची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. हा अवॉर्ड मिळवणं हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. ऑस्कर अवॉर्ड २०२५ साठी भारताकडून अनेक बॉलिवूड, टॉलिवूड आणि मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. ‘घरत गणपती’ या चित्रपटानंतर आणखी एका मराठी चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. संगीत क्षेत्रात आपली मोहोर उमटवणाऱ्या सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाची ऑस्कर २०२५ साठी निवड करण्यात आली आहे.
हे देखील वाचा – निकिता दत्ताच्या ‘घरत गणपती’ चित्रपटाने ऑस्कर 2024 च्या यादीत मिळवले स्थान!
सुधीर फडके म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके बाबूजी. संगीत क्षेत्रातील हे एक अजरामर नाव आहे. बाबूजींचा संगीतमय प्रवास उलगडणारा ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाला जगभरात दमदार प्रतिसाद मिळाला. भारतात नाही तर अमेरिकेत ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटाचे हाऊसफुल्ल शो होते. प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाल्यानंतर आता हा चित्रपट फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया यांच्याकडून २९ चित्रपट स्पर्धेसाठी विचारात घेतला गेला आहे. त्यात या बहुचर्चित चित्रपटाचा समावेश आहे.
प्रेक्षकांसह श्रीधर फडके, आशा भोसले, माधुरी दीक्षितसह अनेक दिग्गजांनी या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले. ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे. ऑस्कर २०२५ मध्ये चित्रपटाची निवड झाल्यानंतर दिग्दर्शक योगेश देशपांडे म्हणतात, “ऑस्करसाठी भारताकडून पाठवल्या जाणाऱ्या २०२४ मधील सर्वोत्तम २९ चित्रपटांच्या यादीत “स्वरगंधर्व सुधीर फडके” या चित्रपटाची निवड होणे, हे खूप अभिमानास्पद आहे. संपूर्ण चित्रपटाच्या टीमचे प्रामाणिक कष्ट यामागे आहेत आणि त्यामुळे प्रत्येकाला हा क्षण आनंद देणारा ठरला. जगातील मोठा समजला जाणाऱ्या ऑस्कर पुरस्काराच्या यादीत आपल्या चित्रपटाचा शेवटच्या फेरीपर्यंत विचार केला जाणे, हे अतिशय मोठे समाधान देणारे आणि पुढील काम करण्यास अधिक ऊर्जा देणारे आहे.”
हे देखील वाचा – ‘धर्मवीर २’ची धमाकेदार सुरूवात, पहिल्याच दिवशी केली रेकॉर्डब्रेक कमाई
सौरभ गाडगीळ प्रस्तुत रिडिफाईन प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचे सौरभ गाडगीळ आणि योगेश देशपांडे निर्माते आहेत. तर चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन योगेश देशपांडे यांचे आहे. ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटात सुनील बर्वे, मृण्मयी देशपांडे, सागर तळाशीकर, मिलिंद फाटक, आदिश वैद्य, सुखदा खांडकेकर, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर, शरद पोंक्षे, उदय सबनीस, चिन्मय पटवर्धन, निखिल राऊत, विभावरी देशपांडे, धीरेश जोशी, परितोष प्रधान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.






