"एका तरी फायर फायटरचं नाव माहितीये का ? लोकांना नेते-अभिनेत्यांच्या नावाने..." डोळ्यात अंजन घालणारा 'अग्नी'चा ट्रेलर रिलीज
‘ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ’वरील ‘अग्नी’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा होताना दिसत आहे. या चित्रपटामध्ये बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. नुकताच रिलीज झालेल्या ह्या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना एक आगळे- वेगळे कथानक पाहायला मिळणार आहे. अग्निशमन दलावर आधारित असलेला चित्रपट येत्या ६ डिसेंबरला रिलीज होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या टीझरला प्रेक्षकांनी दमदार प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आता ट्रेलरने प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता ताणून धरली आहे.
मनोज बाजपेयी यांचा डिस्पॅचच्या शूटिंगदरम्यान झाला होता अपघात, अभिनेत्याने सांगितली कशी आहे तब्येत?
चित्रपटाचे कथानक अग्निशमन दलातील अधिकारी विठ्ठल आणि त्यांचा तापट मेहुणा समित यांच्यावर आधारित आहे. मुंबईतल्या आगीच्या रहस्यमय घटनांचा उलगडा ते दोघेही कशापद्धतीने करतात ? हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. शहरामध्ये लागणाऱ्या आगींमागचे नेमके कारण काय ? ती आग लागत आहे की ? आग लावली जात आहे यामागचा छडा अधिकारी विठ्ठल लावणार आहेत. आगीमागील छडा लावताना अधिकारी, त्यांचा मेहुणा आणि इतर सहकाऱ्यांमध्ये कशापद्धतीने मतभेद होणार ? या प्रश्नाचं उत्तर चाहत्यांना चित्रपट पाहिल्यावर मिळणार.
ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना जितेंद्र जोशी आणि प्रतिक गांधी यांच्यात एक संवाद पाहायला मिळतो. जितेंद्र प्रतिकला म्हणतो, “एका तरी फायर फायटरचं नाव लोकांना माहित आहे का? नेता-अभिनेत्यांच्या नावाने आपल्याकडे चौक बांधले जातात. तुझा मुलगा तरी तुला विचारतो का?” शिवाय सई आणि प्रतीक यांच्यामध्येही एक भावुक सीन दाखवण्यात आला आहे. जेव्हा प्रतीक सईला म्हणतो की त्याच्या जिवंत राहिल्याने कोणालाही फरक पडत नाही. खरंच फरक पडतो का, असा सवाल जेव्हा तो त्यांच्या मुलाला विचारतो तेव्हा त्याची शांतता खूप काही सांगून जाते. हा इमोशनल सीन प्रेक्षकांना खूप काही सांगून जातो.
दिग्विजय झाला ‘बिग बॉस’चा नवीन टाइम गॉड, पॉवर मिळताच घेणार का कशिशचा बदल?
प्रतिक गांधीच्या एका संवादाने प्रेक्षकांच्या डोळ्यात अंजन घातलंय. तो म्हणतो, “फ्रिज का थर्माकॉल भी सीडी पे, बच्चे का सायकल भी सीडी पे, पुराना फर्निचर भी सीडी पे… और आग लगी तो मेरा फायरमन मरता भी सीडी पे…” अग्निशमन दलाच्या कार्यात आग विझवताना किती अडथळे येतात, याबद्दल हा संवाद डोळ्यात अंजन घालणारा ठरतो. ‘ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ’वरील ‘अग्नी’ चित्रपट येत्या ६ डिसेंबरपासून घरबसल्या तुम्हाला हा चित्रपट पाहायला मिळेल. या चित्रपटात जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, सखी गोखले, जयवंत वाडकर या मराठी कलाकारांची प्रमुख भूमिका आहे. याशिवाय प्रतीक गांधी, द्विवेंदू शर्मा, सय्यामी खेर हे बॉलिवूड कलाकारही चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत. सई ताम्हणकरच्या ह्या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांनी दिग्दर्शन केलं असून फरहान अख्तरने चित्रपटाची निर्मिती केलीये.