रितेश देशमुखचा (Riteish Deshmukh) ‘वेड’ हा मराठी चित्रपट (Ved Marathi Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून रितेश आणि जिनिलिया (Genelia D’souza-Deshmukh) बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर एकत्र काम करताना दिसणार आहे. ‘वेड’ चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच जिनिलिया मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. ती या चित्रपटाची निर्माती असून रितेशने दिग्दर्शित केलेला हा पहिला सिनेमा आहे. आपल्या ‘वेड’ (Ved) चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रितेश आणि जिनिलियाने ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show) मध्ये हजेरी लावली आहे. यावेळी, अभिनेता शुभंकर तावडे आणि संगीतकार जोडी अजय-अतुल (Ajay-Atul) हेदेखील उपस्थित होते.
कपिल शर्माने अजय-अतुलला रितेशशी त्यांचे इतके दृढ नाते असण्यामागचे कारण विचारले. या अतुल म्हणाला, असं अजिबात नाही की रितेश नेहमी आमच्याकडे येतो किंवा आम्ही त्याच्याकडे जातो. उलट, तो आम्हाला त्याच्यासोबत कायम नेत असतो. आमच्या संगीत प्रवासात रितेशने अनेक निर्मात्यांकडे आमच्या नावाची शिफारस करुन आम्हाला खूप मदत केली आहे. अशी मदत आम्हाला आजपर्यंत कुणीचं केली नाही.
तो पुढे म्हणाला की, मला अजून आठवतंय, साधारण दहा वर्षांपूर्वी रितेशनी आमचं नाव अनेक निर्माते आणि दिग्दर्शकांना सुचवलं होतं. इतकंच नाही तर त्यांना आमचे संगीत ऐकवत असे आणि मग असे सांगत असे की आम्ही जर त्यांच्या चित्रपटाला न्याय देऊ शकू असा विश्वास त्यांना असला, तर त्यांनी आम्हाला काम द्यावे. ‘अग्निपथ’ चित्रपट आम्हाला रितेशमुळेच मिळाला. रितेशने आमची ओळख धर्मा प्रॉडक्शन्सची टीम, दिग्दर्शक करण मल्होत्रा आणि निर्माता करण जोहरशी करून दिला. आमच्या संगीताची सीडी त्याने ‘अग्निपथ’च्या टीमला ऐकवली. त्यानंतर आम्ही अनेक चित्रपट केले, पण ‘अग्निपथ’ आमच्यासाठी खास आहे. ‘अग्निपथ’मुळे आम्हाला स्वतंत्र ओळख मिळाली. पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी रितेशने आम्हाला मदत केली.
अतुलच्या या उत्तरानंतर रितेश म्हणाला की, त्यांच्या प्रतिभेमुळे ते मोठे झाले आणि झळकले. त्यांना यश मिळाले ते फक्त त्यांच्या कठोर परिश्रमामुळे! आज रात्री 9.30 वाजता प्रेक्षकांना ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये ‘वेड’च्या टीमला पाहण्याची आणि त्यांचे अनुभव ऐकण्याची संधी मिळणार आहे.