मुंबई : बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुखचा (Riteish Deshmukh) आज ४४ वा वाढदिवस आहे. रितेशवर त्याच्या वाढदिवसानिमित्त सिनेसृष्टीतील कलाकारांकडून तसेच चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. अशातच रितेश देशमुखला बॉलिवूडचा दबंग सलमान खानने (Salman Khan)खास बर्थ डे गिफ्ट दिले. सलमान खानने ‘वेड’ (Ved) चित्रपटातील रितेश सोबतच्या नव्या गाण्याचा टिझर लाँच केला आहे. या गाण्यात सलमान खान आणि रितेश धम्माल डान्स करताना दिसत आहेत.
अभिनेता सलमान खान आणि रितेश देशमुख या दोघांमधील नातं फार जिव्हाळ्याचं आहे. दोघेही एकमेकांना ‘भाऊ’ म्हणून हाक मारतात. सलमान खानने या पूर्वी देखील रितेश देशमुखचा पहिला मराठी चित्रपट ‘लय भारी’ मधे पाहुण्या कलाकाराची भूमिका केली होती. रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ हा नवाकोरा चित्रपट ३० डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.
चित्रपटातील ‘बेसुरी’ आणि ‘वेड तुझा’ ही दोन गाणी प्रदर्शित झाली असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. याच चित्रपटातील ‘वेड लावलयं’ हे नवीन गाणं लवकरच प्रदर्शित होणार आहे. यात सलमान खान आणि रितेश देशमुख अजय अतुलने संगीतबद्ध केलेल्या गाण्यावर धम्माल डान्स करताना दिसणार आहेत. सलमानने खानने ‘वेड लावलयं’ गाण्याचं टिझर प्रदर्शित केल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयी उत्सुकता अधिक वाढली आहे.






