‘आमच्यासाठी पण शिवाजी महाराज दैवतच... जो महाराष्ट्रात’, विकी कौशलचं प्रांजळ मत, मराठीतील साधेपणा होतोय व्हायरल
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित (Director Laxman Utekar) ‘छावा’ (chhaava movie)चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. चित्रपटामध्ये अभिनेता विकी कौशलने (Vicky Kaushal) छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिने (Rashmika Mandanna) महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटानिमित्त दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि अभिनेता विकी कौशलने एका मराठी वृत्तपात्राला मुलाखत दिली, या मुलाखतीमध्ये मनमोकळा संवाद साधला.
अभिनेता विकी कौशलने मुलाखतीमध्ये मी मराठी नसलो तरीही मुळचा महाराष्ट्रीयन आहे, असं म्हणाला आहे. मुलाखतीमध्ये विकी कौशल म्हणतो, “माझा जन्म मुंबईतल्या मालाडमधील एका मालवणी कॉलनीमध्ये झाला आहे. मग नंतर पुढे आम्ही अंधेरीमध्ये वन बेडरुम असलेल्या रुममध्ये शिफ्ट झालो. माझं दहावीपर्यंतचं शिक्षण मराठी शाळेतंच झालं आहे. मी SSC बोर्डमध्येच शिकलोय. एक गोष्ट सांगतो, मला दहावीमध्ये असताना मराठी विषयामध्ये खूप चांगले मार्क्स मिळाले होते आणि इंग्लिशमध्ये खूप कमी मार्क्स आले होते. त्यासोबतच माझे क्रिकेट खेळणारे मित्रही मराठीच होते. त्यामुळे माझं लहानपणापासून फार चांगलं मराठी आहे.”
“खरंतर, मला मराठी बोलायला येतं. म्हणजे फार छान नाही पण मी बोलू शकतो आणि मला मराठी समजतंही. मला असं वाटतं की, जो पण मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जन्मलाय किंवा काम करतोय त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सगळी माहिती असली पाहिजे. त्यांना कोणीही सांगायची गरज पडली नाही पाहिजे. खरंतर, इतरत्र भाषिक असलेल्या लोकांनाही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सगळी माहिती असली पाहिजे. आता मी एका पंजाबी कुटुंबामध्ये लहानाचं मोठा झालोय. पण ते आमच्यासाठीही एक आराध्यदैवतच आहेत. आणि असं नाही की आम्हाला कोणी सांगितलंय किंवा आम्हाला कोणी बोललंय. तर नाही. महाराजांप्रती आदर आणि प्रेम जो काही आहे तो मी माझ्या लहानपणापासूनच पाहत आलोय. ज्या बिल्डिंगमध्ये मी लहानाचं मोठं झालोय, त्या बिल्डिंगीच्या गेटवरच नेहमी महाराजांची मुर्ती असायची. त्यांची रोज पूजा- अर्चा केली जायची. त्यांच्या मुर्तीचा हार कायम बदलला जायचा. आम्ही त्यांच्यासमोरच क्रिकेट खेळलोय. आमच्यामध्ये बालपणापासूनच महाराजांप्रती प्रेम आणि आदर आहे.”
“आता आमचा एकच ध्यास आहे की, संपूर्ण जगभरात छत्रपती संभाजी महाराजांबद्दलही जागृतता निर्माण करायची आहे आणि ती सध्या आम्ही करतोय. आमचा मुख्य हेतू हाच आहे की, त्यांची शौर्यगाथा सर्वांनाच माहिती असली पाहिजे.” असं अभिनेता मुलाखतीमध्ये म्हणाला.