(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
भारताच्या पहिल्या फेमिना मिस इंडिया मेहर कॅस्टेलिनो यांच्या निधनाबद्दल दुःखद बातमी समोर आली आहे. त्या ८१ वर्षांच्या होत्या. फेमिना मिस इंडिया ऑर्गनायझेशनच्या इन्स्टाग्राम पेजवर त्यांच्या निधनाची पुष्टी करण्यात आली. संस्थेने त्यांना एक अग्रणी म्हणून वर्णन केले आहे, ज्यांनी येणाऱ्या महिलांच्या पिढ्यांसाठी पाया रचला. मिस इंडिया वर्ल्ड २०२५ नंदिनी गुप्ता यांनीही एका पोस्टमध्ये त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
पहिल्या फेमिना मिस इंडिया मेहर कॅस्टेलिनो यांच्या निधनाने भारतीय स्पर्धा आणि फॅशन जगतात धक्का बसला आहे. १९६४ मध्ये त्यांनी फेमिना मिस इंडियाचा मुकुट जिंकला होता. त्यांचे आता वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्यापही उघड झालेले नसले तरी, अहवाल असे सूचित करतात की त्या वयाशी संबंधित गुंतागुंतीमुळे ग्रस्त होत्या. त्यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाला आहे.
फेमिना मिस इंडियाने मेहर कॅस्टेलिनो यांच्या निधनाची पुष्टी केली
मिस इंडियाच्या आयोजकांनी पहिल्या फेमिना मिस इंडिया मेहर कॅस्टेलिनो यांच्या निधनाची बातमी दुजोरा दिला आहे. आयोजकांनी इन्स्टाग्रामवर त्यांचा एक फोटो आणि एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना लिहिले आहे की, “१९६४ च्या फेमिना मिस इंडिया आणि पहिल्या फेमिना मिस इंडिया मेहर कॅस्टेलिनो यांच्या निधनाबद्दल आम्ही खूप दुःखी आहोत. त्यांनी पुढच्या पिढीला नवीन मार्ग दाखवले, तसेच नव्या पिढीसाठी आदर्श बनले आणि महिलांच्या पिढ्यांना निर्भयपणे स्वप्ने पाहण्याचा पाया घातला. त्यांनी शक्य केलेल्या प्रवासातून आणि त्यांनी साकार केलेल्या स्वप्नांमधून त्यांचा वारसा जिवंत राहील.” असे लिहून त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे.
मिस इंडिया वर्ल्ड २०२५ नंदिनी गुप्ता यांनीही मेहर कॅस्टेलिनो यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांनीही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले, “त्यांनी आपल्या सर्वांसाठी मार्ग मोकळा केला. तुमच्या आत्म्याला शांती लाभो, मॅडम.” असे त्या म्हणाल्या.
मेहर कॅस्टेलिनो कोण होत्या?
शिवाय, मेहर कॅस्टेलिनोचा जन्म मुंबईत झाला. त्यांनी लव्हडेल येथील लॉरेन्स स्कूलमधून पदवी प्राप्त केली. त्यांच्या शिक्षणानंतर काही काळातच, १९६४ मध्ये, मेहरने पहिला फेमिना मिस इंडियाचा किताब जिंकून इतिहास रचला. तसेच त्यांनी मिस युनिव्हर्स आणि मिस युनायटेड नेशन्स स्पर्धांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या पहिल्या फेमिना मिस इंडिया मुकुटासह, कॅस्टेलिनोने फॅशन जगात एक उत्तम कारकीर्द प्रस्थापित केली. त्यांनी जगभरातील २००० हून अधिक लाईव्ह फॅशन शोमध्ये रॅम्प वॉक केला आहे.






