(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
प्राइम व्हिडिओने आपल्या आगामी प्राइम ओरिजिनल कॉमेडी मालिका ‘आदर्श बाल विद्यालय’च्या जागतिक प्रीमियरची घोषणा केली आहे. 24 जुलैपासून ही सात भागांची मालिका भारतासह जगभरातील 240 देश आणि प्रदेशांमध्ये प्राइम व्हिडिओवर स्ट्रीम होणार आहे.
या मालिकेचे दिग्दर्शन हिमांक गौर यांनी केले असून, पोशम पा पिक्चर्सच्या बॅनरखाली बिस्वपती सरकार आणि समीर सक्सेना यांनी एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर म्हणून निर्मिती केली आहे. मालिकेची कथा बिस्वपती सरकार, अक्षय अस्थाना, नूपुर पाई, तत्सत पांडे आणि मेघना श्रीवास्तव यांनी लिहिली आहे.
मालिकेत के. के. मेनन मुख्य भूमिकेत असून ते ज्ञानेश्वर त्रिपाठी या बेफिकीर पण मनाने चांगल्या मुख्याध्यापकाची भूमिका साकारत आहेत. त्यांच्यासोबत अर्चना पूरण सिंह, नवीन कस्तुरिया, प्रसन्ना बिष्ट, अभिमन्यु सिंह, देवेन भोजानी, अजितेश गुप्ता, अन्नपूर्णा सोनी आणि प्राची शाह यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
‘आदर्श बाल विद्यालय’ची कथा एका मोडकळीस आलेल्या शाळेभोवती फिरते. प्रतिष्ठित सरकारी प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्याचे स्वप्न पाहणारे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर त्रिपाठी आपल्या शाळेचं रूप पालटण्याचा निर्धार करतात. यासाठी ते शिक्षकांची एक भन्नाट टीम तयार करतात. मात्र, गोंधळ घालणारी मुलं, संसाधनांचा अभाव, पालकांची उदासीनता आणि प्रशासकीय अडथळे अशा अनेक आव्हानांशी त्यांना सामना करावा लागतो. या प्रवासात विनोदासोबतच भावनिक क्षणांचाही सुंदर मेळ प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
View this post on Instagram
प्राइम व्हिडिओ इंडियाचे डायरेक्टर आणि ओरिजिनल्स प्रमुख निखिल मधोक म्हणाले, “‘आदर्श बाल विद्यालय’ ही शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर भाष्य करणारी, पण तितकीच मनोरंजक आणि हृदयस्पर्शी कॉमेडी मालिका आहे. प्रत्येकाला आपलीशी वाटणारी ही कथा 24 जुलैपासून जगभरातील प्रेक्षकांसाठी उपलब्ध होणार आहे.”
मालिकेचे सहनिर्माते बिस्वपती सरकार आणि समीर सक्सेना म्हणाले, “ही कथा अशा शाळेची आहे जी प्रत्येक निकषावर अपयशी वाटते, पण काही जिद्दी शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे पुन्हा उभी राहण्याचा प्रयत्न करते. या मालिकेत विनोद, वास्तव आणि भावनिक नात्यांचा सुंदर संगम पाहायला मिळेल. के. के. मेनन यांनी ज्ञानेश्वर त्रिपाठी ही भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारली आहे.”
हास्य, भावना आणि प्रेरणादायी प्रवासाचा मिलाफ असलेली ‘आदर्श बाल विद्यालय’ ही मालिका 24 जुलैपासून प्राइम व्हिडिओवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.






