(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बहुचर्चित ‘रील स्टार’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. १७ ऑक्टोबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. सुरुवातीपासूनच चर्चेत असलेल्या या चित्रपटातील सुमधूर गीत-संगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘रील स्टार’च्या माध्यमातून सुमधूर संगीताची जोड देत एक आशयघन कथानक सादर करण्यात आले आहे. दादर शिवाजी पार्क जवळील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहामध्ये ‘रील स्टार’ चित्रपटाचा दिमाखदार संगीत प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते आणि संपूर्ण टिम उपस्थित होती. सारेगामा अंतर्गत संगीतप्रेमींना या चित्रपटातील गीते सादर केली जाणार आहेत.
जे-फाइव्हज एंटरटेनमेंट्स, फिनिक्स ग्रुप आणि इनिशिएटिव्ह फिल्म्सच्या बॅनरखाली जोस अब्राहम, मोनिका आणि निशील कंबाती यांनी ‘रील स्टार’ चित्रपटाची निर्मिती केली असून निर्मलदीप प्रोडक्शनचे नासिर खान आणि गुरविंदर सिंग या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. ‘अन्य’ या हिंदी-मराठी चित्रपटानंतर दिग्दर्शक सिम्मी आणि रॉबिन यांनी ‘रील स्टार’चे दिग्दर्शन केले आहे. ‘रील स्टार’मध्ये भानुदास नावाच्या रस्त्यावरील एका विक्रेत्याची आणि त्याच्या कुटुंबाची कथा पाहायला मिळणार आहे. भानुदासच्या स्वप्नपूर्तीचा हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरावा असा आहे. त्याने दिलेला लढा पाहण्याजोगा आहे. नागराज मंजुळे यांचे बंधू भूषण मंजुळे या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून, प्रसाद ओकने साकारलेली पत्रकाराची व्यक्तिरेखाही खूप महत्त्वाची आहे.
एका रील स्टारची कथा सांगणाऱ्या या चित्रपटात वेगवेगळ्या मुड्समधील आणि वेगवेगळ्या प्रसंगाना अनुसरून एकूण पाच गाणी आहेत. ‘दृश्यम’ फेम संगीतकार विनू थॉमस यांनी या चित्रपटातील चार गीतांना संगीतसाज चढवला असून, ‘घाव दे जरा रा…’ हे गाणे संगीतकार शुभम भट यांनी संगीतबद्ध केले असून शुभम भट यांनी सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांचे सहायक म्हणून काम केले आहे. ‘गर गर गरा…’ हे गाणे मंदार चोळकरने लिहिले असून, अभिजीत कोसंबी व सायली कांबळे यांनी गायले आहे. मंदारनेच लिहिलेले ‘जगूया मनसोक्त सारे…’ हे गाणे रोहित राऊतच्या आवाजात संगीत प्रेमींच्या भेटीला आले आहे. गुरू ठाकूरच्या लेखणीतून अवतरलेले ‘का सुनं सुनं झालं…’ हे मनीष राजगिरेच्या आवाजातील गाणे चित्रपटात एका महत्त्वाच्या टप्प्यावर येते. मंदार चोळकरने लिहिलेले ‘फुलोरा…’ हे गाणे मुग्धा कऱ्हाडेने गायले आहे. ‘घाव दे जरा रा…’ हे गाणे वैभव देशमुख यांनी लिहिले असून, संगीतकार शुभम भट यांनी आदर्श शिंदेच्या आवाजात ध्वनीमुद्रीत केले आहे.
नागराज मंजुळे यांचे सहायक दिग्दर्शक सुधीर कुलकुर्णी यांनी ‘रील स्टार’चे लेखन केले आहे. या चित्रपटात भूषण मंजुळे, प्रसाद ओक, मिलिंद शिंदे, कैलास वाघमारे, उर्मिला जगताप, रुचिरा जाधव, स्वप्नील राजशेखर, शुभांगी लाटकर, विजय पाटकर, अनंत महादेवन, ज्ञानेश वाडेकर, महेश सुभेदार, शिवाजी पाटणे, गणेश रेवडेकर, अभिनव पाटेकर, विशाल अर्जुन, राजेश मालवणकर, प्रशांत शिंदे, करीश्मा देसले यांनी सहायक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. याखेरीज बालकलाकार अर्जुन गायकर आणि तनिष्का म्हाडसे यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटातील व्यक्तिरेखांना भागवत सोनावणे यांनी रंगभूषा केली असून, राणी वानखडे यांनी वेशभूषा केली आहे. दीपक पांडे या चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर असून, रोहित कुलकर्णी असोसिएट डायरेक्टर आहेत. या चित्रपटाचे क्रिएटिव्ह निर्माते महेंद्र पाटील आहेत आणि मुख्य सहयोगी दिग्दर्शक नंदू आचरेकर आहेत. प्रोडक्शन डिझाईन राहुल शर्मा आणि समीर चिटणवीस यांनी केले असून निलेश रसाळ यांनी कला दिग्दर्शन केले आहे.