फोटो सौजन्य - Social Media
जीवनात कितीही मेहनत घेतली तरी एकदा तरी अनपेक्षित ‘घबाड’ मिळावं, चुटकीसरशी नशीब पालटावं. अशी इच्छा प्रत्येकाची असते. अशाच रहस्यमय घबाडाच्या शोधाची गोष्ट मराठीतील आगामी बिगबजेट चित्रपट ‘घबाडकुंड’ मध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘घबाड’ म्हणजे अचानक मिळालेली धनप्राप्ती आणि ‘कुंड’ म्हणजे पाणी साठलेली खोल जागा, या दोन्हींच्या मिलाफातून तयार झालेले हे शीर्षक जितके वेगळे, तितकीच त्याची कथा रहस्यमय आहे.
‘अल्याड पल्याड’च्या यशानंतर दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील, निर्माते रसिक कदम आणि सहनिर्माती स्मिता पायगुडे-अंजुटे यांनी रहस्य, अॅक्शन, विनोद आणि नात्यांची गुंतागुंत यांचा मिलाफ असलेला हा सिनेमा सादर केला आहे. पुण्याजवळील खेड-शिवापूर येथे तब्बल 10-12 हजार स्क्वेअर फूट जागेवर पाण्याचे कुंड, खोल विहिरी, पुरातन मंदिरे, गुहा आणि रहस्यमय मार्ग असलेला नेत्रदीपक सेट उभारण्यात आला आहे. या सेटवर गूढ निर्माण करणारी दृश्ये चित्रीत केली जाणार आहेत.
या चित्रपटात देवदत्त नागे, कुशल बद्रिके, संदीप पाठक, शशांक शेंडे, प्राजक्ता हनमघर, स्मिता पायगुडे-अंजुटे, वैष्णवी कल्याणकर, रॉकी देशमुख, आरोही भोईर, साहिल अनलदेवर यांसारखी बलाढ्य कलाकारमंडळी विविध व्यक्तिरेखांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. मराठीत प्रथमच अशा भव्य कॅनव्हासवर सादर होणाऱ्या या चित्रपटात रहस्य, थरारासोबतच मानवी नात्यांतील अविश्वास आणि संशयाची धारही अनुभवायला मिळणार आहे.
दिग्दर्शक प्रीतम पाटील म्हणाले, “मराठीतही प्रचंड, भव्य कॅनव्हास असू शकतो हे ‘घबाडकुंड’च्या निमित्ताने दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. अप्रतिम सेट डिझाइन, संगीत, छायालेखन, संपादन आणि ग्राफिक्ससह प्रत्येक तांत्रिक बाबीत आम्ही कसूर ठेवलेली नाही.” निर्माते रसिक कदम आणि सहनिर्माती स्मिता पायगुडे-अंजुटे यांनी सांगितले की, ‘आयकॉन दी स्टाईल’ या आपल्या कंपनीच्या माध्यमातून ‘घबाडकुंड’ हा पहिला मनोरंजनपट असून, या वेगळ्या प्रयत्नाला प्रेक्षक नक्कीच दाद देतील.
व्हेलेंटिना इंडस्ट्रीज लि. च्या विशेष सहकार्याने बनलेला हा चित्रपट मराठी, हिंदी आणि तेलगू भाषांत प्रदर्शित होणार आहे. कथा लेखन संजय नवगिरे आणि अक्षय धरमपाल यांचे असून, कलादिग्दर्शन योगेश इंगळे, छायांकन योगेश कोळी, संपादन सौमित्र धाराशिवकर यांनी केले आहे. कार्यकारी निर्माता आकाश जाधव आहेत. साऊथचे प्रसिद्ध फाईट मास्टर कार्तिक यांनी अॅक्शन दृश्ये हाताळली आहेत. नववर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित होणारा ‘घबाडकुंड’ हा केवळ रहस्यमय कथा नसून प्रेक्षकांना ‘लार्जर दॅन लाईफ’ अनुभव देणारा चित्रपट ठरणार आहे.