Grammys 2025 organisers forget to pay tribute four time grammy winner tabla maestro zakir hussain
Grammys Award 2025 : भारतीय तबलावादक आणि चार वेळा ग्रॅमी पुरस्कार विजेते झाकीर हुसैन यांना ६७ व्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यामध्ये ‘इन मेमोरियम’ सेगमेंटमधून (श्रद्धांजली विभाग) वगळण्यात आल्यामुळे सोशल मीडियावर संगीत प्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. आयोजकांच्या या मोठ्या चुकीमुळे सोशल मीडियावर झाकीर हुसेन यांच्या चाहत्यांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. ही आयोजकांची मोठी चूक असल्याचे म्हणत सोशल मीडियावर आयोजकांवर जोरदार टीका केली जात आहे.
रेकॉर्डिंग अकादमीने आयोजित केलेला हा पुरस्कार सोहळा रविवारी लॉस एंजेलिसमधील क्रिप्टो डॉट कॉम अरेना येथे आयोजित करण्यात आला होता. दरवर्षी, आयोजकांकडून ‘इन मेमोरिअम’ सेगमेंटमध्ये, ग्रामी मॉन्टेजद्वारे मागील वर्षी निधन झालेल्या दिग्गज कलाकारांना श्रद्धांजली वाहिली जाते. झाकीर हुसैन यांनी एकाच वर्षी एकूण ३ ग्रॅमी पुरस्कार जिंकणारे झाकीर हुसैन हे पहिले भारतीय होते. झाकीर हुसैन यांचं गेल्या वर्षी १५ डिसेंबर रोजी सॅन फ्रान्सिस्कोच्या रुग्णालयात फुफ्फुसाच्या समस्येमुळे (इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिस) त्यांचं निधन झालं, ते ७३ वर्षांचे होते.
रत्नागिरीमध्ये रंगलीय तालुकास्तरीय नाट्यस्पर्धा, गावकऱ्यांना मिळणार अनेक कलाकृतींचा नजराणा
ग्रॅमीच्या ‘इन मेमोरियम’ विभागात, जेव्हा निधन झालेल्या कलाकारांना श्रद्धांजली वाहण्यात येत होती, तेव्हा झाकीर हुसैन यांचं त्या यादीमध्ये नाव नव्हतं. यावर भारतीय शिवाय, आंतरराष्ट्रीय चाहत्यांनीही आक्षेप घेतला आहे. सोशल मीडियावरील अनेक युजर्सनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच रेकॉर्डिंग अकादमीला टॅग करत ही चूक कशी काय झाली ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. “ग्रॅमीच्या ‘इन मेमोरियम’ सेगमेंटमध्ये झाकीर हुसैन यांचं नाव कसं नव्हतं? ते गेल्या वर्षीचे विजेते आहेत”, “श्रद्धांजली विभागात त्यांचा उल्लेख न करणं ही खरोखरच एक मोठी चूक आहे”, “ग्रॅमी पुरस्कार विजेते आणि अनेकदा ग्रॅमीचं नामांकन मिळूनही झाकीर हुसैन यांना श्रद्धांजली विभागामध्ये समाविष्ट न करणं ही खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे.” अशा कमेंट्स नेटकऱ्यांकडून करण्यात आलेल्या आहेत.
या वर्षीच्या ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात अनेक महान संगीतकारांना आदरांजली वाहण्यात आली. त्यामध्ये, लियाम पेन, क्रिस क्रिस्टोफरसन, सिसी ह्यूस्टन, टिटो जॅक्सन, जो चेंबर्स, जॅक जोन्स, मेरी मार्टिन, मारियान फेथफुल, सेजी ओझावा आणि एला जेनकिन्स यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे. यावेळी ख्रिस मार्टिनने ‘कोल्डप्ले’ भारत दौऱ्यावरून परतल्यानंतर ‘इन मेमोरिअम’मध्ये श्रद्धांजली सादर केली. यावेळी त्यांना गिटार वादक ग्रेस बोवर्स यांचीही साथ होती.