(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
शरदऋतूच्या आगमनाची चाहुल लागली आणि वातावरण उत्सवाचा रंग भरू लागले की सत्याधारित मनोरंजनासाठी ओळखल्या जाणाऱ्या काही सर्वोत्कृष्ट वाहिन्यापैकी एक सोनी बीबीसी अर्थ आपल्या प्रेक्षकांना प्रेरणा आणि मनोरंजन पुरविण्यासाठी आकर्षक कार्यक्रमांची मालिका घेऊन येते. आपल्या नेहमीच्या आयुष्यातील वस्तूंच्या निर्मितीमागची जटिल प्रक्रिया उलगडून दाखविणाऱ्या ‘इनसाइड द फॅक्टरी’पासून ते सस्तन प्राण्यांच्या असामान्य जगाचे दर्शन घडविणाऱ्या ‘मॅमल्स’पर्यंत विविध विषयांवरचे हे कार्यक्रम प्रेक्षकांच्या मनाला नवचेतना देतात.
आपल्या आठव्या पर्वासह पुनरागमन करणारा कार्यक्रम ‘इनसाइड द फॅक्टरी’ प्रेक्षकांना युरोपातील काही सर्वात मोठ्या फॅक्टरींच्या अद्भुत सफरीवर घेऊन जाणार आहे. ७ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रेक्षकांना जीन्सपासून बाथ बॉम्ब्ज व जेलीबीन्सपर्यंत आपल्या दैनंदिन वापरातल्या अनेक वस्तूंच्या निर्मितीमागचे विज्ञान जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. ग्रेग वॉलेस आणि चेरी हीली यांच्या साथीने या वस्तूंच्या उत्पादनप्रक्रियेचा शोध घ्या आणि घरात सतत वापरल्या जाणाऱ्या या वस्तूंचा इतिहास जाणून घ्या.
दरम्यान, २१ ऑक्टोबर २०२४ रोजी ‘मॅमल्स’ हा कार्यक्रम प्रेक्षकांना प्राण्यांच्या विलक्षण जगाचा शोध घेण्यासाठी आमंत्रित करत आहे. या सहा भागांच्या मालिकेमध्ये चिमुकल्या एट्रुस्कन श्रूपासून ते अगडबंब ब्लू व्हेलपर्यंत वेगवेगळ्या सस्तन प्राण्यांमधील विविधता, निसर्गाशी जुळवून घेण्याच्या त्यांच्या क्षमता दाखविल्या जाणार आहेत. हे प्राणी अत्यंत प्रतिकूल वातावरणामध्ये कसा तग धरतात आणि बदलत्या जगामध्ये सामना कशाप्रकारे करतात याचा शोध तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने करता येईल. हे प्राणी आपल्या पृथ्वीग्रहावरील बदलत्या परिस्थितीतून मार्ग काढत असताना दिसून येणारी त्यांची बुद्धिमत्ता, त्यांची समाजशीलता व चिकाटी याचे साक्षीदार बनता येईल.
हे देखील वाचा- Bigg Boss 18 : बिग बॉसच्या घरात वादाची ठिणगी पेटली! रजत दलाल विरुद्ध ताजिंदर बग्गा
सोनी बीबीसी अर्थवर प्रदर्शित होणारे या कार्यक्रमांचे चित्तवेधक पहिले भाग न चुकवता नक्की पहा. इनसाइड द फॅक्टरीचा पहिला भाग ७ ऑक्टोबर रोजी दुपारी १:०० वाजता प्रदर्शित होणार आहे, तर मॅमल्सचा पहिला भाग २१ ऑक्टोबर रोजी रात्री ९:०० वाजता प्रदर्शित होणार आहे. दोन्ही कार्यक्रम सोनी बीबीसी अर्थवर सोमवार ते शुक्रवार दाखविले जाणार आहे.