फोटो सौजन्य - Social Media
आजच्या धावपळीच्या युगात आरोग्य सांभाळणे हे खूप कठीण झाले आहे. वेळेवर खाणे, विश्रांती घेणे आणि योग्य आहार घेणे हे अनेकांना जमत नाही. यामुळे शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. पण अभिनेत्री शरयू सोनवणे सांगते की, “जर आपण पचेल तेवढे खाल्ले आणि योग्य आहार घेतला, तर ही धावपळ सुद्धा सहज पेलता येते.” झी मराठीवर संध्याकाळी ७.३० वाजता प्रसारित होणाऱ्या ‘पारू’ मालिकेत शरयू अभिनय करते. ती नेहमीच निरोगी आणि संतुलित आहार घेण्यावर भर देते.
जंक फूड किंवा फास्ट फूडच्या दुनियेतही नैसर्गिक, पौष्टिक घटकांचा समावेश असलेल्या आहाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे तिचे मत आहे. शरयू आपल्या आहाराबाबत खूप सजग आहे. ती सांगते, “मी दिवसाची सुरुवात भिजवलेल्या ड्रायफ्रुट्सने करते. त्यानंतर जिरं पाणी किंवा नारळपाणी पिते. सेटवर पोहे, उपीट, इडली किंवा ऑम्लेट ब्रेड असा नाश्ता घेते. मग एक फळ — संत्रं, सफरचंद, मस्कमेलन, कलिंगड किंवा किवी घेते.”
नाश्त्यानंतर सकाळी ११ ते १२.३० च्या सुमारास ती सलाड खाते आणि मग दुपारी जेवण करते. दुपारच्या जेवणात एक भाकरी, भाजी आणि दही असते. कधी कधी डाळ खिचडीही खाते, ती सुद्धा इंद्रायणी भातात. दुपारच्या जेवणानंतर सूर्यास्त होईपर्यंत ती मखाना, चणे-शेंगदाणे किंवा ड्रायफ्रुट्सचे लाडू खाते. सूर्यास्तानंतर ती काहीच खात नाही. शरयू म्हणते, “सूर्यास्तानंतर आपल्या पचनशक्तीचा वेग मंदावतो, त्यामुळे त्या वेळेनंतर खाणे टाळले पाहिजे.”
तिच्या दिवसभराच्या पाण्याच्या सवयीही लक्षवेधी आहेत. ती दररोज सुमारे २.५ ते ३ लिटर पाणी पिते, जे शरीरातल्या घामाद्वारे जाणाऱ्या पाण्याच्या प्रमाणाची भर घालण्यासाठी आवश्यक असतं. विशेषतः उन्हाळ्यात ती ताक आणि सब्जाचे पाणी पिण्यावर भर देते, जे शरीरात थंडावा राखण्यासाठी आणि पचन व्यवस्थित ठेवण्यासाठी उपयोगी ठरतं. शरयूच्या या आहारशैलीकडून आपण एक महत्त्वाचा धडा घेऊ शकतो की आपल्या शरीराची गरज ओळखा, नैसर्गिक आणि घरचं अन्न खा, आणि वेळेवर पचेल तेवढं खा. अशा सवयी अंगीकारल्यास अगदी व्यस्त जीवनशैलीत सुद्धा तुम्ही आरोग्यसंपन्न आणि ताजेतवाने राहू शकता.