'लाईक आणि सबस्क्राईब'मधून जुई भागवतचे रुपेरी पडद्यावर पदार्पण
Jui Bhagwat Movie : सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये ‘लाईक आणि सबस्क्राईब’ हे वाक्य सर्वश्रृत झालं आहे. अनेकदा आपण गाण्यांमधून किंवा कोणाच्या बोलण्यातू आपण हा शब्द ऐकलेला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच ‘लाईक आणि सबस्क्राईब’ या नावाच्या चित्रपटाची घोषणा झाली होती. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये सध्या कमालीची उत्सुकता आहे. ‘लाईक आणि सबस्क्राईब’ या चित्रपटात अमृता खानविलकर आणि अमेय वाघ प्रमुख भूमिकेत आहे. त्यांच्यासोबत आणखी एक नवीन चेहरा झळकला होता. काहींनी हा चेहरा ओळखला. तर काहींना हा नवीन चेहरा कोणाचा, असा प्रश्न पडला होता.
हे देखील वाचा – अरबाजला रितेश देशमुखचा दणका, उघडणार का घरच्यांचे डोळे
तर ही अभिनेत्री ‘तुमची मुलगी काय करते?’ मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या जुई भागवतचा. ‘लाईक आणि सबस्क्राईब’ च्या माध्यमातून जुई मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. जुई एक उत्तम नर्तिका आणि गायिकाही आहे. टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांमध्ये पाडल्यानंतर जुई भागवत आता रुपेरी पडदा गाजवायला सज्ज झाली आहे. ‘लाईक आणि सबस्क्राईब’ या चित्रपटाच्या माध्यमातून जुई भागवतने रुपेरी पडद्यावर डेब्यू केले आहे.
चित्रपटातील पदार्पणाबद्दल जुई भागवत म्हणते, “बालपणापासूनच मला अभिनयाचे बाळकडू मिळाले आहेत. माझी आईच एक अभिनेत्री आहे, त्यामुळे तिच्याकडूनच माझ्यावर नकळत अभिनयाचे संस्कार झाले. मालिकांमध्ये आणि शोमध्ये काम केल्यानंतर आता मी ‘लाईक आणि सबस्क्राईब’मधून मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाले आहे. यातील माझी भूमिका खूपच वेगळी असून हा एक रहस्यमय चित्रपट आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी खूप जास्त उत्सुक आहे. चित्रपटाची कथा एकदम जबरदस्त आहे, त्यात पदार्पणात अशा कलाकारांसोबत, टीमसोबत काम करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. संपूर्ण टीमकडून बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. एका नवोदिताला आणखी काय हवे असते? ”
नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, आणि अभिषेक मेरूकर प्रॉडक्शन्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य, अभिषेक मेरूकर निर्माते असून ‘लाईक आणि सबस्क्राईब’चे लेखन आणि दिग्दर्शन अभिषेक मेरूकर यांनी केले आहे. यात अमेय वाघ, जुई भागवत, अमृता खानविलकर, शुभंकर तावडे, विठ्ठल काळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या १८ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.