मराठी सेलिब्रिटींचा प्राजक्ता माळीला "फुल्ल ऑन सपोर्ट...", "जाहीर निषेध" म्हणत शेअर केल्या पोस्ट
मराठी फिल्म इंडस्ट्रीतील हरहुन्नरी अभिनेत्री प्राजक्ता माळी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी करुणा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांनी केलेल्या आरोपांमुळे प्राजक्ता प्रकाशझोतात आलेली आहे. प्राजक्ता माळीने काल पत्रकार परिषद घेऊन सर्वांच्याच वक्तव्याचा समाचार घेतला. आमदार सुरेश धस यांनी केलेल्या आरोपांवर प्राजक्ता माळीने महिला आयोगांत तक्रार दाखल केली आहे. आता मनोरंजनविश्वातून अनेकजण प्राजक्ताला पाठिंबा देण्यासाठी पुढे सरसावले आहेत.
हास्यजत्रेचे लेखक सचिन गोस्वामी आणि डान्सर गौतमी पाटील यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनंतर आणखी काही सेलिब्रिटींनी इन्स्टा पोस्ट शेअर केली आहे. अभिनेता कुशल बद्रिके आणि अभिनेता सुशांत शेलार यांनी प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर केली आहे. अभिनेता कुशल बद्रिकेने इन्स्टाग्रामवर “जाहीर निषेध”चा पोस्टर शेअर करत प्राजक्ताला पाठिंबा देत म्हणतो की, “कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सुद्धा ३ ते ४ वेळा परळीला गेलोय, काय ते परळी पॅटर्न का काय म्हणतात तशी मी सुद्धा नाचताना कंबर हलवली पण मला त्याचं कधी काही वाटलं नाही, वाटलं किती छान कलाकारांचा सन्मान करणारं शहर आहे. पण आता मात्र “धस” होतंय काळजात, कुणाचं ठाऊक स्वतःची पोळी भाजण्यासाठी आपल्या कमरेत सुद्धा एखाद्याला इंटरेस्ट यावा. बीडमध्ये झालेल्या खुनाचा निषेध आणि प्राजक्ता माळीच्या चारित्र्याचा खून करू पाहणाऱ्या वृत्तीचाही निषेध!! प्राजक्ता मी तुझ्यासोबत आहे.”
तर प्राजक्ताच्या समर्थनार्थ सुशांत शेलारनेही इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केलेली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये सुशांत शेलार म्हणतो, “नमस्कार, कालपासून सगळ्या न्यूज चॅनल आणि सोशल मीडियावरती एका वाचाळवीरा कडून “महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्री प्राजक्ता माळी”यांच्या बद्दल जी खालच्या पातळीची टीका होत आहे, त्याचा मी कठोर शब्दांत निषेध करतो. अशा पद्धतीने कुठल्याही महिला कलाकाराला राजकारणात खेचून खालच्या पातळीवर टीका करणे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. अश्या काही वाचाळवीरांमुळे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वातावरण दुषित झाले आहे. त्यांना वेळीच आळा घातला पाहिजे. मी एक कलाकार म्हणून “प्राजक्ता माळी”यांच्या सोबत आहे. मी सुशांत शेलार…”
नेमकं प्रकरण काय ?
आष्टी विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार सुरेश धस यांनी बीडमध्ये मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाविषयी बोलताना मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली होती. यावेळी सुरेश धस यांनी बोलताना रश्मिका मंदाना, सपना चौधरी आणि प्राजक्ता माळीचंही नाव घेतलं होतं. “प्राजक्ताताई माळी सुद्धा आमच्या परळीत येतात. परळीचा हाही एक पॅटर्न आहे.” असं वक्तव्य सुरेश धस यांनी केलं होतं. सुरेश धस यांच्या या वक्तव्यावर काल प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत तिची बाजू मांडली. शिवाय तिने पत्रकार परिषदेत काही नेत्यांना चांगलंच सुनावलं. शनिवारी प्राजक्ताने पत्रकार परिषदेत विशेषत: महिला कलाकारांची बाजू मांडली. नेतेमंडळींनी त्यांच्या गोष्टीत कलाकारांना मध्ये आणू नये असं ती म्हणाली. शिवाय आमदार सुरेश धस यांनी तिच्यावर केलेले आरोप पूर्णत: खोटे असल्याचे तिने स्पष्ट केलं.