"नवरा माझा नवसाचा 2" चित्रपटाचे पहिले पोस्टर
‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटाने प्रेक्षकांना वेडे केले होते. या चित्रपटातील कथा, संवाद आणि कलाकारांचा अभिनयाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. या चित्रपटातील कॉमेडी पाहून चाहते खळखळून हसले. प्रत्येक कलाकारांनी या चित्रपटामध्ये आपली भूमिका उत्कृष्ट बजावली होती. तर एसटीमधल्या सगळ्याकलाकारांनी प्रेक्षकांना भरपूर हसवले. या चित्रपटामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांना सचिन पिळगांवकर आणि अशोक सराफ यांची केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. आता याच दरम्यान ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटातील देखील गंमती जमती पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.
तब्बल १९ वर्षापूर्वी अल्पावधीतच हिट झालेल्या “नवरा माझा नवसाचा” या एव्हरग्रीन सिनेमाच्या अभूतपूर्व यशानंतर आता “नवरा माझा नवसाचा 2” हा या चित्रपटाचा सिक्वल येणार हे जाहीर झाल्यापासूनच रसिक प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आलेल्या रिलीज डेटच्या टीजर व्हिडिओला तर अल्पावधीतच कमालीचा प्रतिसाद मिळाला होता. तसेच, नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले असून येत्या २० सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
हे देखील वाचा- ‘नवरा माझा नवसाचा २’ ठरेल मराठी सिनेमाचा टर्निंग पॉईंट? सिनेमाबद्दल ‘या’ गोष्टी नक्कीच जाणून घ्या
सुश्रिया चित्र निर्मित “नवरा माझा नवसाचा 2” या चित्रपटाची निर्मिती झाली असून, या चित्रपटाची कथा – पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले आहे. तसेच या चित्रपटाचे संवाद लेखन संतोष पवार यांनी केले आहे. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव अशी दमदार स्टारकास्ट आपल्याला या चित्रपटाच्या पोस्टरवर पहायला मिळत आहे, त्यामुळे प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन होणार यात शंका नाही.