(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
आगामी ‘पाणीपुरी’ या मराठी चित्रपटात तब्बल एक नाही तर चार नव्या जोड्या प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येणार आहेत. वेगवेगळ्या कलाकृतीच्या माध्यमातून सातत्याने नवं करू पाहणारा अभिनेता कैलास वाघमारे त्याच्या जोडीला ‘हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री शिवाली परब तसेच, आपल्या विनोदाच्या भन्नाट टायमिंगने रसिकांना खळखळून हसवणारे अभिनेते भारत गणेशपुरे-प्राजक्ता हनमघर, बिनधास्त आणि मिश्किल स्वभावाने आपली प्रत्येक भूमिका गाजवणारे ऋषिकेश जोशी या चित्रपटामध्ये दिसणार आहेत. तसेच त्यांच्या जोडीला ब्युटीफुल अभिनेत्री प्रतीक्षा जाधव सोबत सचिन बांगर-अनुष्का पिंपूटकर हे दोन नवे तरुण चेहरे यात धमाल करणार आहेत. या जोड्यांच्या सोबतीला अभिनेता मकरंद देशपांडे, सायली संजीव, विशाखा सुभेदार हे अनुभवी कलाकार कथेत जबरदस्त रंग भरणार आहेत. एस.के प्रॉडक्शन निर्मित आणि रमेश चौधरी यांचे लेखन-दिग्दर्शन असलेला ‘पाणीपुरी’ चित्रपट येत्या १५ नोव्हेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.
संजीवकुमार अग्रवाल हे या चित्रपटाचे निर्माता आहेत. तर सहनिर्माते चंद्रकांत ठक्कर, अनिकेत अग्रवाल आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करणाऱ्या या कलाकारांची पडद्यावरील नवी केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘पाणीपुरी’ चित्रपटाचा मजेशीर टिझर नुकताच प्रदर्शित झाला होता. नर्म विनोदी, खेळकर पद्धतीने जीवनदर्शन घडवत या जोड्यांच्या प्रेमाची परिणीती, त्यांचा प्रवास भविष्यामध्ये कशाप्रकारे होतो याची गमतीशीर कथा ‘पाणीपुरी’ चित्रपटामध्ये उलगडणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.
हे देखील वाचा – ‘गुलाबी’ चित्रपटाच्या टायटल साँगमध्ये दिसणार मैत्रीचे रंग, २२ नोव्हेंबरला चित्रपट होणार दाखल!
आयुष्याचा समतोल साधायचा असेल तर असे दोन परस्परविरुध्द, भिन्न स्वभावाची व्यक्तिमत्त्वं एकत्र असणं ही देखील सहजीवनाची गरज असते. सहजीवनाची ही गंमत उलगडणारा ‘लज्जतदार नात्यांची चटकदार गोष्ट’ सांगणारा ‘पाणीपुरी’ चित्रपट आपलं मनोरंजन नक्की करणार आहे. चित्रपटाचे छायांकन आणि संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचे आहे. पटकथा-संवाद संजय नवगिरे यांनी लिहिले आहेत. संगीत अजित परब तर पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. गीतकार मंदार चोळकर यांच्या गीतांना गायक मंदार आपटे, अजित परब यांचे स्वर लाभले आहेत. ‘पाणीपुरी’ हा चित्रपट येत्या १५ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.