मराठी कलाकार आणि क्रिकेट यांचं नातं नेहमीच खास राहिलं आहे. कधी क्रिकेटपटू अभिनयाच्या मैदानात उतरतात, तर कधी कलाकार क्रिकेटच्या मैदानावर आपली आवड आणि उत्साह दाखवतात. क्रिकेट म्हटलं की आपोआपच उत्साह संचारतो आणि हा उत्साह आता मराठी सिनेसृष्टीतही नव्या रूपात पाहायला मिळणार आहे. अभिनेता सुशांत शेलार यांच्या पुढाकारातून यंदा पहिल्यांदाच ‘एस.एस. सेलिब्रिटी बॉक्स क्रिकेट लीग’ (SSCBCL) चे आयोजन थेट दुबईत करण्यात येत आहे. शुटिंगचे व्यस्त वेळापत्रक, कामाचा ताण आणि वेळेअभावी अनेक कलाकारांना क्रिकेट खेळता येत नाही, ही बाब लक्षात घेऊन सुशांत शेलार यांनी ही अभिनव संकल्पना साकारली आहे. या उपक्रमासाठी ज्योती एन्टरटेन्मेंटचे हार्दिक जोशी आणि रंजन जोशी यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
Star Pravah : TRP मुळे स्टार प्रवाहवर वाहिनीचा मोठा निर्णय; दोन महिन्यातच ‘या’ मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप
मनोरंजन क्षेत्रासोबतच राजकारण आणि समाजकारणात सक्रिय असलेले सुशांत शेलार हे सामाजिक उपक्रमांसाठीही ओळखले जातात. कोविड काळात असो वा पूरपरिस्थिती, गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी ते नेहमीच पुढे असतात. ‘शेलार मामा फाउंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि मदतकार्याचे उपक्रम राबवले आहेत. समाजप्रती असलेली हीच बांधिलकी आणि सकारात्मक दृष्टिकोन आता मनोरंजनाच्या माध्यमातूनही दिसून येत आहे.
एसएससीबीसीएल (SSCBCL) या लीगमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील कलाकार सहभागी होणार आहेत. या लीगमध्ये केवळ पुरुष कलाकारच नव्हे, तर महिला कलाकार, माध्यमकर्मी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स यांचाही सहभाग असणार आहे. त्यामुळे ही लीग केवळ क्रिकेटपुरती मर्यादित न राहता एक मोठा मनोरंजनात्मक आणि सामाजिक मंच ठरणार आहे. लवकरच या लीगमधील संघांची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.
या लीगचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संघांची नावे. पर्यावरण, संस्कृती आणि महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाचे स्मरण जपण्यासाठी संघांना त्या अनुषंगाने नावे देण्यात आली आहेत. रत्नदुर्ग-रत्नागिरी, सिंधुदुर्ग-मालवण, ताडोबा-नागपूर, अजिंक्यतारा-सातारा, शिवनेरी-पुणे, पन्हाळा-कोल्हापूर, गोदावरी-नाशिक अशा नावांच्या संघांचा समावेश या लीगमध्ये असणार आहे. या माध्यमातून महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख सातासमुद्रापार पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
“एक्सपीरियन्स द एक्स्ट्राऑर्डिनरी!” अल्लू अर्जुनने दिले पुढील मोठ्या प्रोजेक्टचे संकेत?
एसएससीबीसीएल (SSCBCL) तसेच संघांमधील कलाकारांची घोषणा आणि लोगोचे अनावरण लवकरच माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती अभिनेता सुशांत शेलार यांनी दिली आहे. याआधीही सुशांत शेलार यांनी विविध मनोरंजनात्मक उपक्रमांच्या माध्यमातून नवनवीन संकल्पना यशस्वी करून दाखवल्या आहेत. त्याच उत्साह, उमेद आणि जोशाने आता दुबईत ‘एस.एस. सेलिब्रिटी बॉक्स क्रिकेट लीग’चे आयोजन करत मराठी चित्रपटसृष्टी पुन्हा एकदा मनोरंजनाच्या नव्या पर्वासाठी सज्ज झाली आहे. ही लीग मराठी कलाकारांसाठीच नव्हे, तर जगभरातील मराठी प्रेक्षकांसाठीही एक वेगळा आणि खास अनुभव ठरणार आहे.













