'गेम चेंजर'च्या निर्मात्यांकडून ४५ जणांविरोधात तक्रार दाखल, नेमकं कारण काय ?
सध्या संपूर्ण देशात दाक्षिणात्य चित्रपटांची जोरदार क्रेझ पाहायला मिळत आहे. टॉलिवूड चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत असून जगभरात बक्कळ कमाई करताना दिसत आहेत. नुकताच दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता राम चरण आणि बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी यांचा ‘गेम चेंजर’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत असल्याचे दिसत आहे. पण तरीही चित्रपटाला एका गोष्टीचा मोठा तोटा सहन करावा लागत आहे, तो म्हणजे ऑनलाईन पायरसीचा…
‘गेम चेंजर’ चित्रपट रिलीज झाल्यानंतर ३ दिवसांच्या आत निर्मात्यांनी चित्रपटाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या ऑनलाईन पायरसी प्रकरणी ४५ जणांविरुद्ध तक्रार दाखल केली असून चौकशीची मागणी केली आहे. याशिवाय निर्मात्यांनी आरोप केला आहे की ते त्यांच्या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये नकारात्मकता पसरवत आहेत. स्त्रोतांवर विश्वास ठेवला गेला तर, चित्रपट दुर्दैवाने रिलीजच्या काही दिवसांतच पायरसीचा बळी ठरला. चित्रपट बनवण्यात खूप मेहनत आणि वेळ खर्च झाला पण त्यानंतरही हा चित्रपट पायरसीचा बळी ठरला. आता या चित्रपटाचे पायरेटेड व्हर्जन लीक झाले आहे. या प्रकरणात, निर्मात्यांना ४५ लोकांची ओळख पटली असून त्यांनी आता 45 व्यक्तींविरोधात तक्रार देखील दाखल केली आहे.
‘मेला’मध्ये ऐश्वर्या राय साकारणार होती ‘रूपा’ची भूमिका ; दिग्दर्शकाने २५ वर्षांनंतर केला खुलासा
चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच टीमच्या काही सदस्यांना सोशल मीडियावर चित्रपट चालू न देण्याच्या धमक्या आल्याचेही समोर आले आहे. गुन्हेगारांनी पैशांची मागणी केली होती आणि पैसे न मिळाल्यास चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये नकारात्मकता पसरवण्याची धमकी दिली होती. आता या चित्रपटाची एचडी लिंकही टेलिग्राम आणि वेगवेगळ्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर लीक झाली आहे. ‘गेम चेंजर’ सोशल मीडिया टीमने नकारात्मकता पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी ‘गेम चेंजर’ टीमने सायबर क्राईममध्ये तक्रार दाखल केली आहे. आता ज्या ४५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यांच्याबद्दलचा सविस्तर तपास पोलीस करणार आहेत. ते एकटे आहेत की त्यांचा ग्रुप आहे का? अशी कामे करण्यासाठी त्यांना मदत कुठून मिळते? याशिवाय निर्मात्यांनी चित्रपटाबाबत सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या नकारात्मकतेवर कारवाई करण्याचे आवाहनही केले आहे.
चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटाने 3 दिवसात 88 कोटींचा गल्ला जमवला आहे.