"माझं लग्न झालं होतं, पण...", शेवंता लग्नसंस्थेबद्दल जरा स्पष्टच बोलली
‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेतून महाराष्ट्रातल्या घराघरांत प्रसिद्ध झालेल्या अपूर्वा नेमळेकरने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मालिकेमध्ये अभिनेत्रीने शेवंताचं पात्र साकारलं होतं. ‘बिग बॉस मराठी ४’ आणि ‘प्रेमाची गोष्ट’मधून प्रेक्षकाचं मनोरंजन करणाऱ्या अपूर्वा सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. अपूर्वा कायमच तिच्या कामासोबतच पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत राहते. करिअरच्या शिखरावर असताना अपूर्वाचं लग्न झालं होतं. मात्र काही कारणांमुळे तिचा घटस्फोट झाला. मात्र, आता अपूर्वाने पुन्हा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
विराट कोहली अनुष्कासोबत प्रथमच रामलल्लाच्या दर्शनाला; लखनऊहून अचानक कारने अयोध्येला पोहोचला
नुकतंच अपूर्वाने एका पॉडकास्टमध्ये सांगितलं की, “माझं लग्न झालं होतं. आता घटस्फोट होऊन साधारण १० वर्षे सुद्धा झाली आहेत. त्या गोष्टीतून मी संपूर्ण बाहेर पडली आहे. काही गोष्टी स्वीकारण्यासाठी वेळ लागला. माझ्यासोबत जो विश्वासघात झाला होता, तो पचवण्यासाठीही वेळ लागला. आणि त्या सगळ्यातून मला असं वाटतंय की मला नेमकं काय हवंय आणि काय नको, याची मला स्पष्टता आली आहे. मला लगेच कोणत्या नात्यात यायचं नव्हतं. त्यामुळे मी बराचसा वेळ घेतला. पण, मला वाटतं की आता मी तयार आहे. पण, बऱ्याच लोकांना मी सिंगल आहे, ही गोष्ट पटत नाही. कारण, सगळ्यांना असं वाटतं की मी उगाचच काहीतरी सांगते. पण, हो मी सिंगल आहे.”
डिजिटल दुनियेतली मस्ती ‘त्या’ तिघांच्या अंगलट येणार का ? ‘आंबट शौकीन’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
“कळलंच नाही की इतके वर्ष गेले कधी… काही वर्ष दु:खात गेली, काही वर्ष स्वत:ला ओळखण्यात गेली. मग काही वर्षांनी सिंगल असल्याची मजा यायला लागली.” पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत अपूर्वा नेमळेकरने लग्नसंस्थेबाबतही भाष्य केलंय, “खरंतर, माझा लग्नसंस्थेवर भयंकर विश्वास आहे. जर एका योग्य व्यक्तीबरोबर असेल तो खूप सुंदर अनुभव आहे. पण, मला असं वाटतं की लग्न करायचं आहे की नाही, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. प्रेम, विश्वास, प्रामाणिकपणा हे सगळं तुम्हाला मिळणार आहे का आणि त्याहीपेक्षा महत्वाचं की तुम्ही समोरच्याला हे सगळं देऊ शकता का? ज्या दिवशी याची जाणीव होईल की तुम्ही हे सगळं द्यायला आणि स्वीकारायला तयार आहात. तरच तुम्ही केलं पाहिजे.”
“उगाचंच समाजाचा दबाव आहे, आपल्या वयातल्या सगळेच लग्न करत आहेत म्हणून कोणी लग्न करू नये. आपल्याला नेमकं काय हवंय आणि आपण हे देऊ शकतो का, आपण एखाद्या व्यक्तीची साथ देऊ शकतो का हे जाणून घेतल्यानंतरच लग्न करावे. नाहीतर त्यांच्याबरोबर बऱ्याच लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. पण, माझा लग्नसंस्थेवर विश्वास आहे आणि मला पुन्हा एकदा ते सगळं अनुभवायचं होतं.”