Seema Deo Passed Away: मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव (Seema Deo) यांचे आजाराने निधन झाले (Seema Deo Passed Away)आहे. वयाच्या 81 व्या वर्षी सीमा देव यांनी अखेरचा श्वास घेतला. दीर्घ आजारानं मुंबईतल्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं.
मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वात आपल्या उत्तम अभिनयाचा ठसा सीमा देव यांनी उमटवला. सीमा देव यांनी मराठी आणि हिंदी सिनेमात उल्लेखनीय काम करत नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांनी जवळपास ८० हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये काम केले होते. 2020 पासून सीमा देव अल्झायमर या आजाराने त्रस्त होत्या. सकाळी मुंबईतल्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं.
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतली सोज्ज्वळ अभिनेत्री अशी सीमा देव यांची ओळख. दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या त्या पत्नी होत्या. तसंच विविध चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा खास ठसा उमटवला होता. आनंद या सिनेमात त्यांनी राजेश खन्नासह केलेली भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहे. नलिनी सराफ असं त्याचं मूळ नाव. रमेश देव यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्या सीमा देव झाल्या. 1957 साली आलिया भोगासी या सिनेमातून सीमा देव यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. जगाच्या पाठीवर, आनंद, यंदा कर्तव्य आहे, या सुखांनो या अशा अनेक हिंदी आणि मराठी सिनेमातील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.]
2020 मध्ये त्यांना अल्झायमर या आजाराने ग्रासलं होतं. अभिनेते अजिंक्य देव यांनीच ट्वीट करुन ही माहिती दिली होती. सीमा देव यांच्या निधनानं मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.