फोटो सौजन्य - Social Media
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भक्तीचा नवा स्वर घेऊन वैशाली माडे यांच्या आवाजातील ‘शंकराचा बाळ आला’ हे गीत प्रदर्शित झाले आहे. पीसफुल बिट्स प्रॉडक्शन्स निर्मित या गाण्याला मंदार चोळकर यांनी ओजस्वी शब्दरचना दिली असून, वरुण लिखाते यांनी संगीतबद्ध केले आहे. वैशाली माडे यांच्या सुरेल आणि भावपूर्ण आवाजाने या गीताला भक्तीभावाची आणि उत्सवाची खरी अनुभूती दिली आहे.
गाण्यातील कथा ही विशेष आहे. निसर्गरम्य कोकणातील गणेशोत्सवाचे चित्रण यात आहे, मात्र या उत्सवी वातावरणात एक भावनिक बाजू गुंफली आहे – एका सैनिक आईची कथा. गणेशोत्सवासाठी घरी आलेली ही आई बाप्पाची सेवा पूर्ण भक्तिभावाने करते आणि नंतर देशसेवेसाठी पुन्हा निघते. तिच्या त्यागातून भक्ती, कुटुंब आणि देशभक्ती या तिन्हींचा सुंदर संगम दिसतो. या कथेमुळे हे गाणं केवळ उत्सवी नसून प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणारे ठरते.
गीतामध्ये योगिता चव्हाण यांचा भावपूर्ण चेहराभाव, अभिजीत केळकर यांची ऊर्जा आणि लहानग्या आरव आयेरचा निरागस आनंद यांनी गाण्याला प्रेक्षकांच्या मनाजवळ आणले आहे. ढोल-ताशांचा गजर, फुलांच्या सजावटीतला रंग, आरत्यांचा स्वर आणि प्रसादाचा सुवास यातून उलगडलेले वातावरण प्रत्येकाला आपल्या घरच्या गणेशोत्सवाची आठवण करून देते. दिग्दर्शक पराग सावंत यांनी सांगितले की, “या गाण्यात प्रत्येक फ्रेममध्ये भक्तीभाव आणि उत्सवाचा आत्मा पकडण्याचा प्रयत्न केला आहे. संगीत, दृश्य आणि भावना यांच्या संगमातून प्रेक्षकांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहील, अशी आम्हाला खात्री आहे.”
गायिका वैशाली माडे म्हणतात, “गणेशभक्तीचा स्वर हा माझ्या गायकीचा अविभाज्य भाग राहिला आहे. ‘शंकराचा बाळ आला’ हे गीत भक्तीची अनुभूती देणारं आहे. यात शब्द, सूर आणि भावनांचा अनोखा मिलाफ आहे, जो श्रोत्यांना थेट गणेशोत्सवाच्या पवित्र वातावरणात घेऊन जातो. हे गाणं गणेशभक्तांच्या हृदयात दीर्घकाळ गुंजत राहील, असा मला विश्वास आहे.” हे गीत गणेशोत्सवात भक्ती, कुटुंबप्रेम आणि देशभक्तीची नवी भर घालणारं ठरलं आहे.