फोटो सौजन्य - Social Media
अभिनेत्री शिल्पा शेट्टीला बॉम्बे हायकोर्टाने मोठा धक्का दिला आहे. तिच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) जारी केलेले लुकआउट नोटीस रद्द करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. हे नोटीस ₹60 कोटींच्या फसवणूक प्रकरणाशी संबंधित आहे, ज्यात तिचा पती व्यावसायिक राज कुंद्रा मुख्य आरोपी आहे. शिल्पा शेट्टीने न्यायालयात दावा केला होता की, तिला राज कुंद्राच्या कंपनीशी काहीही देणंघेणं नाही आणि ती फक्त नाममात्र संचालक होती. मात्र, मुख्य न्यायाधीश श्रीचंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने तिचा दावा फेटाळला. न्यायालयाने टिप्पणी केली, “जर तुम्हाला परदेशात जायचे असेल, तर आधी सरकारी साक्षीदार बना.”\
न्यायालयाने शिल्पा शेट्टीला 16 ऑक्टोबरपर्यंत लेखी प्रतिज्ञापत्र (affidavit) सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच न्यायालयाने म्हटले, “जर तुम्ही म्हणत आहात की कंपनीशी तुमचा काही संबंध नाही, तर तुमचे पती राज कुंद्रानेही त्या दाव्याचे प्रतिज्ञापत्र सादर करावे.” त्याचबरोबर न्यायालयाने स्पष्ट केले की, सर्वप्रथम तक्रारदाराला देय असलेली ₹60 कोटींची रक्कम जमा करावी.
हे प्रकरण 2015 ते 2023 या कालावधीत बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेड या आता बंद झालेल्या कंपनीशी संबंधित आहे. व्यापारी दीपक कोठारी यांनी राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीवर सुमारे ₹60 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. कोठारी यांचे म्हणणे आहे की, या दोघांनी त्यांना गुंतवणुकीसाठी प्रवृत्त केले आणि नंतर निधी वैयक्तिक वापरासाठी वळवला.
ईओडब्ल्यूच्या चौकशीत राज कुंद्राने सांगितले की, कंपनीला नोटाबंदीच्या काळात मोठे नुकसान झाले, त्यामुळे कर्ज फेडणे शक्य झाले नाही. या प्रकरणात कुंद्राची दोनदा आणि शिल्पा शेट्टीची 4 तास चौकशी झाली आहे. या दाम्पत्याने लुकआउट नोटीस स्थगित करण्याची विनंती केली होती, जेणेकरून त्यांना व्यावसायिक कारणांमुळे आणि पर्यटनासाठी परदेश प्रवास करता येईल. मात्र न्यायालयाने ही मागणी नाकारली. न्यायालयाने सांगितले की, जेव्हा दोघांवर फसवणुकीचा आरोप आहे, तेव्हा अशा प्रवासास परवानगी देता येणार नाही. न्यायालयाने स्पष्ट केले की, सध्या अटक न करण्याचे कारण त्यांचा तपासात सहयोग आहे; पण पुढील दिलासा तेव्हाच मिळेल, जेव्हा ₹60 कोटींची संपूर्ण रक्कम जमा केली जाईल.