Ajay Gogavale Odh Tujhya Pandharichi Song Released
पंढरपूरच्या वारीचा शुभमुहूर्त आणि लाखो भाविकांची विठ्ठलावरची निस्सीम श्रद्धा याला समर्पित असलेलं एक नवं भक्तिगीत नुकतंच प्रदर्शित झालं आहे. “ओढ तुझ्या पंढरीची” असं या गाण्याचं नाव असून, हे माऊली म्युझिक कंपनीच्या वतीने प्रकाशित झालेलं त्यांचं पहिलं गाणं आहे. सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले यांच्या आवाजात हे गीत सादर करण्यात आलं आहे. गाण्याच्या संगीताची धुरा नितीन उगलमुगले यांनी सांभाळली आहे. गीतकार मुकुंद भालेराव यांनी गीतलेखन केलं असून, गाण्याची शीर्षक ओळ अपूर्व राजपूत यांची आहे. गाण्याचं दिग्दर्शन पवन लोणकर यांनी केलं आहे. संगीत संयोजन पद्मनाभ गायकवाड यांचं आहे. या गाण्याचं ध्वनिमुद्रण व मिश्रण विनायक पवार यांचे आहे. तर संकलन (एडिटिंग) धीरज भापकर यांनी केलं आहे.
‘Metro ची कथा आजच्या पिढीशी जोडलेली…’, अनुपम खेर यांनी दिग्दर्शक अनुराग बसूचे केले कौतुक
हे गाणं ३४० व्या पालखी प्रस्थानाच्या दिवशी प्रदर्शित झालं आणि लगेचच प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतोय. सोशल मीडियावर अनेकांनी या गाण्यावर आधारित रील्स आणि व्हिडिओ तयार केले आहेत. आम्ही यामुळे भारावून गेलो आहोत व एक नवी ऊर्जा आम्हाला मिळत आहे.
संगीतकार नितीन उगलमुगले या गाण्यामागच्या प्रवासाविषयी सांगतात, “आम्ही याआधी ‘मायबापा विठ्ठला’ हे गाणं एकत्र केलं होतं, ते खूप गाजलं. त्यातून प्रेरणा घेऊन मी, मुकुंद भालेराव आणि पवन लोणकर – आम्ही तिघांनी मिळून ‘माऊली म्युझिक कंपनी’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. आमची पार्श्वभूमी वारकरी संस्कृतीशी जोडलेली असल्याने भक्तिगीत हा आमच्या कामाचा केंद्रबिंदू राहणार आहे. ‘ओढ तुझ्या पंढरीची’ हे आमचं पहिलं गाणं अजयदादांच्या आवाजात सादर झालं आणि त्याला मिळालेला प्रतिसाद आमच्यासाठी खूपच उत्साहवर्धक आहे.”
पुढे ते सांगतात, ”या गाण्याची संकल्पना पंढरपूरच्या ओढीवर आधारित आहे. वारकऱ्यांच्या मनातील विठ्ठल भेटीची ओढ, चालत्या वारीतील भावभावना आणि साधेपणाने व्यक्त केलेली श्रद्धा – हे सगळं या गीतातून ऐकायला मिळतं. माऊली म्युझिक कंपनी लवकरच आणखी भक्तिगीतं आणि भावस्पर्शी संगीत प्रकल्प घेऊन येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. “आमचा उद्देश असा आहे की, भक्ती आणि सांस्कृतिक संगीत नव्या पिढीपर्यंत पोहोचवावं. नवनवीन कलाकारांना संधी द्यावी आणि पारंपरिक संगीत नव्या स्वरूपात सादर करावं,” असंही त्यांनी नमूद केलं.”
हे गाणं यूट्यूबसह विविध डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर पाहता आणि ऐकता येत आहे. विठ्ठलाच्या भक्तीत रंगून जाणाऱ्या प्रत्येकासाठी “ओढ तुझ्या पंढरीची” हे गाणं एक सुंदर अनुभव ठरत आहे.