date of the Samman Maharashtra 2025 program has been postponed
भारत- पाकिस्तान हल्ल्याचा भारतीय सिनेसृष्टीवरही मोठा परिणाम झाला आहे. काही बॉलिवूड कलाकारांनी आपले परदेशात असलेले कॉन्सर्ट आणि दौरे, चित्रपटांचं थिएटर रिलीज, चित्रपटाचं ऑडिओ लॉंचिंग इव्हेंट आणि पुरस्कार सोहळे रद्द केले. आता अशातच ‘सन्मान महाराष्ट्राचा २०२५’ हा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे. आयोजकांकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आलं आहे. ‘सन्मान महाराष्ट्राचा २०२५’ हा कार्यक्रम सध्या स्थगित करण्यात आला असून या कार्यक्रमाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
“जवळपास १५ तास वीणा घेऊन उभी होते”, इंद्रायणीने शेअर केला शुटिंग दरम्यानचा अविस्मरणीय अनुभव
जम्मू काश्मिरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २६ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने ७ मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ करत पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मिरमध्ये प्रतिहल्ला केला. या हल्ल्यामध्ये भारतीय लष्कराने अनेक दहशतवादी संघटनेचे तळ उद्धवस्त करुन टाकले आहेत. त्या हल्ल्यानंतर दोन्हीही लष्करांकडून प्रतिहल्ले होताना दिसत आहेत. या आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणावाचा परिणाम मनोरंजन जगतावरही झाला आहे. अनेक कलाकारांचे कार्यक्रम रद्द करत होत असताना ‘सन्मान महाराष्ट्राचा २०२५’ हा पुरस्कार सोहळाही रद्द करण्यात आला आहे. आयोजकांकडून अधिकृत निवेदनही जारी करण्यात आलं आहे.
‘सन्मान महाराष्ट्राचा २०२५’ कार्यक्रम रद्द झाल्यानंतर आयोजकांकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आलं आहे. त्यामध्ये ते म्हणतात, ” “सन्मान महाराष्ट्राचा २०२५” हा सोहळा, ३१ मे २०२५ रोजी MMRDA मैदान, BKC येथे भव्य स्वरूपात पार पडणार होता. तो सध्याच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. देशात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आणि काही भागांमध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यांमुळे संपूर्ण देशात चिंता आणि अस्वस्थतेचे वातावरण आहे. अशा गंभीर आणि संवेदनशील वेळी, नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर होणारा सार्वजनिक जमाव टाळणे आणि नागरिकांना कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही, याची दक्षता घेणे हे ‘earth’ NGO चे कर्तव्य आहे. या पार्श्वभूमीवर, “सन्मान महाराष्ट्राचा २०२५” हा कार्यक्रम सध्या स्थगित करून पुढे ढकलण्यात येत आहे. हा निर्णय आम्ही अतिशय काळजीपूर्वक विचार करून घेतला आहे. आम्हाला या कार्यक्रमासाठी तुमच्याकडून लाभलेल्या सहकार्याचे आणि प्रेमाचे मोल आहे. कार्यक्रमाची पुढील तारीख परिस्थिती स्थिर झाल्यावर लवकरच जाहीर करण्यात येईल.”