फोटो सौजन्य - Social Media
देशातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या संघटनांपैकी एक असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी वर्षानिमित्त तयार करण्यात आलेल्या ‘शतक : संघ के १०० वर्ष’ या चित्रपटाच्या ट्रेलरचे मुंबईत भव्य सोहळ्यात अनावरण करण्यात आले. हा ट्रेलर संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाचे सदस्य व ज्येष्ठ पदाधिकारी डॉ. मनमोहनजी वैद्य यांच्या हस्ते, विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलर लाँचपूर्वी निर्मात्यांकडून निवडक माध्यम प्रतिनिधींसाठी विशेष प्रिव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डॉ. मनमोहन वैद्य स्वतः उपस्थित राहिल्याने पत्रकारांना चित्रपटाचा आशय, दृष्टीकोन आणि उद्देश अधिक सखोलपणे समजून घेण्याची संधी मिळाली.
२०२५ हे वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी अत्यंत महत्त्वाचे असून, याच वर्षी संघाने आपल्या स्थापनेची शंभर वर्षे पूर्ण केली आहेत. गेल्या शतकभरात संघाने सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक पातळीवर देशभरात मोठा प्रभाव निर्माण केला आहे. मात्र, त्याच वेळी संघाबाबत अनेक गैरसमज, वाद आणि टीकाही सतत होत राहिल्या. ‘शतक’ हा चित्रपट केवळ समर्थन किंवा विरोध न करता, संघाच्या इतिहासाकडे समतोल आणि संदर्भयुक्त दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करतो.
ट्रेलरमध्ये संघाची स्थापना १९२५ मध्ये डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी कशी केली, तसेच एम. एस. गोळवलकर (गुरुजी) यांच्या नेतृत्वाखाली संघाला संघटनात्मक बळ कसे मिळाले, याचे चित्रण दिसून येते. संघाची शिस्त, मूल्यव्यवस्था, स्वयंसेवकांची भूमिका आणि दीर्घकालीन दृष्टिकोन यांचा शतकी प्रवास संघाच्या स्वतःच्या अनुभवांतून मांडण्याचा प्रयत्न चित्रपटात करण्यात आला आहे.
महत्त्वाचे म्हणजे, चित्रपटात संघावर विविध काळात लादण्यात आलेल्या बंदी, स्वातंत्र्यलढ्यातील संघाची भूमिका, आणीबाणीचा काळ यांसारख्या संवेदनशील आणि अनेकदा दुर्लक्षित विषयांवरही प्रकाश टाकण्यात येणार असल्याचे ट्रेलरमधून स्पष्ट होते. त्यामुळे प्रेक्षकांना संघाच्या इतिहासाकडे अधिक व्यापक आणि सखोल दृष्टीने पाहता येणार आहे.
या प्रसंगी बोलताना डॉ. मनमोहन वैद्य म्हणाले की, “‘शतक’च्या माध्यमातून संघाची कथा समाजापर्यंत पोहोचेल, ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. चित्रपट हे प्रभावी माध्यम असून, त्यातून मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचता येते. दिग्दर्शक व निर्मात्यांनी हा चित्रपट अत्यंत सर्जनशीलतेने साकारला आहे.” दिग्दर्शक आशिष मल्ल यांनी सांगितले की, हा चित्रपट बनवताना संघाबाबत अनेक नव्या गोष्टी समजल्या. “ही कथा मी निवडली नाही, तर या कथेनेच माझी निवड केली. प्रेक्षकांनी स्वतः प्रश्न विचारावेत आणि उत्तर शोधावीत, असा शेवट आम्हाला अपेक्षित होता,” असे त्यांनी नमूद केले.
निर्माता विर कपूर यांनी ‘शतक’ ही केवळ आकड्यांची नव्हे, तर शंभर वर्षांच्या संस्कारांची, सेवाभावाची आणि त्यागाची कथा असल्याचे सांगितले. कोणत्याही सत्तेचा किंवा प्रचाराचा आधार न घेता संघाने लोकांच्या मनात स्थान निर्माण केले, हे या चित्रपटातून अधोरेखित करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अनिल डी. अग्रवाल यांची संकल्पना, आशिष मल्ल दिग्दर्शित, विर कपूर निर्मित आणि आशिष तिवारी सहनिर्मित ‘शतक : संघ के १०० वर्ष’ हा चित्रपट १९ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार असून, संघाच्या शतकी प्रवासाचा सखोल वेध घेणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.






