संपूर्ण राज्यभरात आषाढी एकादशी मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केली जाते. यादिवशी विठ्ठल रुक्मिणीची मनोभावे पूजा करून नैवेद्यात विविध पदार्थ सुद्धा बनवले जातात. तसेच महिलांसह पुरुषसुद्धा उपवास करतात. उपवासाच्या दिवशी घरात कायमच साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडा बनवला जातो. पण साबुदाणे खाल्ल्यामुळे अपचन, ऍसिडिटी, पित्त होण्याची खूप जास्त शक्यता असते. त्यामुळे उपवास केल्यानंतर कायमच पचनास हलक्या पदार्थांचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया आषाढी एकादशीच्या उपवासाला कोणते पदार्थ खावेत. (फोटो सौजन्य – istock)
साबुदाणा खाऊन ॲसिडिटी होते? मग आषाढी एकादशीच्या उपवासाला खा 'हे' पौष्टिक पदार्थ, पचायला हलके

उपवासाच्या दिवशी केळी आणि दूध एकत्र करून बनवलेले शिकरण खावे. केळी खाल्ल्यामुळे पोट भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. याशिवाय केळी आणि दुधाच्या मिश्रणात थोडेसे तूप टाकावे.

साबुदाणे किंवा बटाटा खाल्ल्यामुळे ऍसिडिटी वाढते. त्यामुळे उपवास केल्यानंतर शिजवलेली रताळी खावी. तसेच रताळ्याचे गोड काप किंवा भाजी सुद्धा बनवू शकता.

दुपारच्या जेवणात वरीचा भात आणि शेंगदाण्याची तिखट आमटी खावी. वरीच्या तांदळाचा वापर करून इतर अनेक पदार्थ बनवले जातात. हे पदार्थ चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहेत.

दूध, केळी, सुका मेवा, खजूरचा वापर करून बनवलेले स्मूदी बाऊल चवीला अतिशय सुंदर लागते. पौष्टिक पदार्थांच्या सेवनामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहील आणि लवकर भूक लागणार नाही.

आषाढी एकादशी किंवा इतर कोणत्याही वेळी उपवास केल्यानंतर ताज्या फळांचा आहारात समावेश करावा. फळे खाल्ल्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते आणि अपचनाच्या समस्या उद्भवत नाही.






