संग्रहित फोटो
निलंगा : निलंगा तालुक्यातील हरीजवळगा येथे शेतीच्या वाटणीच्या वादातून पुतण्याने आपल्या चुलत्याचा दगड व काठीने मारहाण करून निघृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना १५ जुलै रोजी सकाळी सुमारे ८ वाजता घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून गावावर शोककळा पसरली आहे. जमिनीच्या वाटणीच्या वादातून रक्ताच्या नात्याचाच बळी गेल्याने हरीजवळगा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
वाटणीच्या वादात जीव गेला; वादातून रक्तरंजित झाला शेवट
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू उर्फ राजेंद्र शामराव चव्हाण यांचा भावकीसोबत शेतीच्या वाटणीवरून अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. बुधवारी सकाळी त्यांच्या शेतात राजेंद्र चव्हाण व त्यांचा पुतण्या मुरली चन्नाप्पा चव्हाण यांच्यात पुन्हा वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संतापाच्या भरात आरोपीने दगड व काठीने राजेंद्र चव्हाण यांच्या डोक्यावर वार केले. गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर आपल्या हातून खून झाल्याची जाणीव होताच आरोपी मुरली चन्नाप्पा चव्हाण स्वतः कासारसिरसी पोलीस ठाण्यात हजर झाला.
मयताचे पुत्र संतोष चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध कासारसिरसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि प्रताप गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार आबा इंगळे, शंकर बुड्डे व सहकारी करीत आहेत.
न्यायालयाच्या गेटवरच पत्नीला जाळण्याचा प्रयत्न
सिल्लोडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. न्यायालयात एका जुन्या भांडणाची साक्ष देण्यासाठी आलेल्या महिलेला तिच्याच पतीने अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी (दि. १७) दुपारी चार वाजेच्या सुमारास सिल्लोड शहरातील मुख्य रस्त्यावरील न्यायालयाच्या गेटजवळ घडली आहे. दरम्यान या घटनेने एकच खळबळ उडाली होती. अशोक मोठेबा चंदनशिव (वय ३२, रा. खुपटा, ता. सिल्लोड) असे आरोपी पतीचे तर लक्ष्मी (२८, रा. खुपटा, ह. मु. जालना) असे पत्नीचे नाव आहे. सदर महिला शुक्रवारी खुपटा गावातील जुन्या भांडणाची साक्ष देण्यासाठी न्यायालयात आली होती. तर आरोपी पतीही आलेला होता. साक्ष संपल्यानंतर न्यायालयाबाहेर येताच आरोपीने पत्नीला सोबत चालण्याचा हट्ट धरला. पत्नीने नकार देताच आरोपीने बॅगमधून पेट्रोल भरलेली बाटली काढली व अंगावर टाकली. पत्नीने आरडाओरडा करताच रस्त्यावरील नागरिक मदतीला धावले व पुढील अनर्थ टळला.






