खाल्लेले अन्नपदार्थ सहज पचन होण्यासाठी पोटात गॅस्ट्रिक ॲसिड असते. पण रिकाम्या पोटी कोणतेही पदार्थ खाल्ल्यानंतर गॅस्ट्रिक ॲसिड अधिक सक्रिय होते, ज्याच्या परिणामामुळे आतड्यांना हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. रिकाम्या पोटी कोणत्याही पदार्थांचे सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढण्यासोबतच आरोग्याला हानी पोहचते. चुकीच्या वेळी आंबट फळे किंवा इतर पदार्थ खाल्ल्यानंतर ॲसिडिटी वाढून गॅस, जळजळ आणि अल्सरसारख्या गंभीर समस्या निर्माण होतात. चला तर जाणून घेऊया उपाशी पोटी कोणत्या पदार्थांचे सेवन करु नये.(फोटो सौजन्य – istock)
उपाशी पोटी चुकूनही करू नका 'या' पदार्थांचे सेवन, आतड्यांमध्ये अल्सर होऊन उद्भवेल ॲसिडिटी- गॅसची समस्या

संत्रे, मोसंबी, द्राक्षे किंवा अननस यांसारख्या आंबट फळांचे सेवन उपाशी पोटी अजिबात करू नये. या फळांमध्ये नैसर्गिकरित्या ॲसिडचे प्रमाण जास्त असते. हे पदार्थ पोटात गेल्यानंतर छातीत जळजळ, गॅस आणि गॅस्ट्रिक अल्सरचा धोका निर्माण करतात.

भारतासह जगभरातील इतर सर्वच देशांमध्ये चहाप्रेमी लोकांची संख्या खूप जास्त आहे. सकाळी झोपेतून उठल्यानंतर सगळ्यात आधी चहा कॉफीचे अतिशय आवडीने सेवन केले जाते. पण उपाशी पोटी चहा कॉफी प्यायल्यास ऍसिडिटी वाढते.

रिकाम्या पोटी तिखट किंवा मिरचीचा वापर करून बनवलेले पदार्थ खाऊ नयेत. मसाल्यांमधील कॅपसायसिन नावाचा घटक आढळून येतो, ज्यामुळे पोटाच्या संवेदनशील अस्तराला हानी पोहचते.

कच्च्या भाज्यांमध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे उपाशी पोटी कच्च्या भाज्या किंवा जास्त फायबर असलेले पदार्थ खाऊ नये. यामुळे पोट फुगणे किंवा गॅसच्या समस्या वाढू शकतात.

सकाळी उठल्यानंतर गोड पदार्थ, बिस्किटे किंवा सोडा पिणे टाळावे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते आणि लिव्हरवर जास्तीचा तणाव निर्माण होतो. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे.






